अ‍ॅपलचा ‘आयफोन ११’ २७ सप्टेंबरपासून भारतात; आधीच्या आयफोनच्या दरांतही कपात

न्यूयॉर्क : वैशिष्टय़पूर्ण आणि अद्ययावत तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅपल कंपनीने बुधवारी ‘आयफोन’ मालिकेत तीन नव्या स्मार्टफोनची भर घातली. कॅलिफोर्निया येथे झालेल्या वार्षिक परिषदेत ‘आयफोन ११’सह ‘आयफोन ११ प्रो’ आणि ‘आयफोन ११ प्रो मॅक्स’ हे दोन स्मार्टफोन, आयपॅड व अ‍ॅपल वॉचची नवी आवृत्तीची घोषणा कंपनीने केली. या घोषणेचे वैशिष्टय़ म्हणजे, यंदाचा ‘आयफोन’हा गतवर्षीच्या ‘आयफोन एक्सआर’पेक्षा ५० अमेरिकी डॉलरने स्वस्त असणार आहे. भारतात येत्या २७ सप्टेंबरपासून दाखल होणाऱ्या ‘आयफोन ११’ची किंमत ६४ हजार ९०० रुपयांपासून सुरू होणार आहे. त्यासोबतच अ‍ॅपलने आयफोनच्या आधीच्या आवृत्त्या असलेल्या आयफोन ७, आयफोन ८, आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्सआरच्या दरांतही कपात केली आहे.

स्मार्टफोनच्या बाजारात अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित स्मार्टफोनचा सुकाळ असताना अ‍ॅपलचे आयफोन हे तुलनेने महाग असल्याने सर्वसामान्य ग्राहक त्याला फारशी पसंती देत नाहीत. विशेषत: भारतासारख्या विकसनशील देशांत स्मार्टफोनची बाजारपेठ अधिकाधिक विस्तारत असताना या बाजारात स्पर्धात्मक किमती घेऊन उतरण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातूनच अ‍ॅपलने यंदा ‘आयफोन ११’चे दर आटोक्यात ठेवल्याचे बोलले जात आहे. गतवर्षी अ‍ॅपलने ‘आयफोन एक्सआर’ हा स्मार्टफोन ७४९ डॉलर या किमतीत आणला होता. मात्र, ‘आयफोन ११’ची सुरुवातीची किंमत ६९९ डॉलर इतकी ठेवण्यात आली आहे. अर्थात ‘आयफोन ११’सोबत सादर झालेल्या ‘११ प्रो’ आणि ‘११ प्रो मॅक्स’ या प्रीमियम श्रेणीतील आयफोनचे दर मात्र ९९९ ते १०९९ डॉलरच्या घरांत आहेत. मात्र, आधीच्या आयफोनच्या तुलनेत तसेच अन्य कंपन्यांच्या स्मार्टफोनच्या तुलनेत हे सर्व फोन अधिक वेगवान असतील, असा कंपनीचा दावा आहे. ‘नवीन आयफोन क्षमता आणि रचना या दोन्हींच्या बाबतीत अनेक वैशिष्टय़ांनी समृद्ध आहेत,’ असे अ‍ॅपलचे विशेष कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी कॅलिफोर्नियातील कुपर्टिनो येथील अ‍ॅपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात स्पष्ट केले.

कूक यांनी या कार्यक्रमात नव्या श्रेणीतील आयपॅडही सादर केला. १०.२ इंचाचा रेटिना डिस्प्ले, अद्ययावत कॅमेरा, अ‍ॅपल पेन्सिलयुक्त आणि ए१० फ्यूजन हा वेगवान प्रोसेसर असलेल्या या आयपॅडची किंमत ३२९ डॉलर इतकी असणार आहे. भारतात तो २९ हजार ९०० रुपयांना उपलब्ध होईल. नव्या ऑपरेटिंग सिस्टिममुळे या आयपॅडवर ‘मल्टिटास्किंग’ (बहुकृतिक्षम) करणे अधिक सोयीचे होणार आहे. ‘अ‍ॅपल वॉच सीरिज ५’ हा स्मार्टवॉचमध्येही कंपनीने रेटिना डिस्प्ले पुरवला असून यात दिशादर्शक, आंतरराष्ट्रीय आपत्कालीन संपर्क अशा सुविधा असणार आहेत. हे वॉच भारतात ४० हजार ९०० रुपयांना उपलब्ध होणार आहे.

*आयफोन’चे दर

* आयफोन ११ – ६४,९०० रुपयांपासून पुढे

* आयफोन ११प्रो  – ९९,९०० रुपये

* आयफोन ११ प्रो मॅक्स – १,०९,९०० रुपये

* आयफोन एक्सआर (६४ जीबी)- ४९,९०० रुपये

* आयफोन एक्सएस (६४ जीबी) – ८९,९०० रुपये

* आयफोन एक्स (६४ जीबी) – ९१,९०० रुपये

* आयफोन ८ (६४ जीबी) – ३९,९०० रुपये

* आयफोन ७ प्लस (३२ जीबी)-  ३७,९०० रुपये

* आयफोन ७ (३२ जीबी) – २९,९०० रुपये.

‘आयफोन ११’ची वैशिष्टय़े

‘आयफोन ११’मध्ये १२ मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे मागील बाजूस देण्यात आले असून यातील सॉफ्टवेअरही सुधारण्यात आले आहे. यामध्ये ‘अल्ट्रा वाइड अँगल मोड’ तसेच ‘नाइट मोड’ उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘आयफोन ११’ची बॅटरी आधीच्या आयफोनपेक्षा एक तास जास्त वेळ कार्यरत राहील, असा कंपनीचा दावा आहे. हा फोन अधिक वेगवान असल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे. ‘आयफोन ११ प्रो’ आणि ‘प्रो मॅक्स’ या दोन्ही स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस प्रत्येकी १२ मेगापिक्सेलचे तीन कॅमेरे पुरवण्यात आले आहेत.

‘नेटफ्लिक्स’ला आव्हान

अ‍ॅपलने ‘अ‍ॅपल टीव्ही प्लस’ नावाची ‘व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा’ सुरू करण्याची घोषणा केली. येत्या एक नोव्हेंबरपासून १००हून अधिक देशांत ही सेवा सुरू होईल. सध्या ऑनलाइन मनोरंजनाचा प्रेक्षकवर्ग वाढत असल्याचे हेरून अ‍ॅपलने या क्षेत्रातही शिरकाव केला आहे. या सेवेच्या माध्यमातून नवनवीन वेबमालिका, लोकप्रिय टीव्ही मालिका तसेच चित्रपट प्रेक्षकांना आपल्या अ‍ॅपल टीव्ही अथवा अन्य अ‍ॅपलच्या उपकरणांवर पाहता येणार आहेत. भारतात दरमहा ९९ रुपये इतक्या कमी शुल्कात ही सेवा उपलब्ध होईल. विशेष म्हणजे, जगभरात सर्वत्र ही सेवा पाच डॉलरपेक्षा कमी मासिक शुल्कात उपलब्ध होणार असून याद्वारे नेटफ्लिक्सला टक्कर देण्याचा अ‍ॅपलचा हेतू स्पष्ट झाला आहे.