योगगुरु बाबा रामदेव हे सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. ते नेहमी योगासनं आणि व्यायामासंबंधीचे व्हिडिओ देखील शेअर करत असतात. तसेच या गोष्टी शेअर करताना लोकांना ते व्यायाम आणि योगासनांसाठी प्रोत्साहित करीत असतात. त्यांनी असाच एक व्हिडिओ नुकताच ट्विटरवरुन शेअर केला. यामध्ये ते दोरी उड्या मारताना दिसत आहेत.

दोरी उड्या मारत बाबा रामदेव लोकांना योगासनं करण्याचा संदेश देत आहेत. इंडिया टीव्हीच्या या व्हिडिओमध्ये बाबा रामदेव यांनी १० सेकंदात १८ वेळा दोरी उड्या मारल्या. या व्हिडिओत रामदेव म्हणतात, “आपलं आयुष्य किती असेल हे तर निसर्ग आणि देवच निश्चित करतो. पण आपण आपलं शरीर निरोगी कसं ठेवायचं हे आपल्या हातात आहे. आपलं आयुष्य मोठं असावं आणि आपण कायम आरोग्यपूर्ण असावं यासाठी लहानपणापासूनच योगासनं करणं गरजेचं आहे.”

माकडाचा व्हिडिओ केला होता शेअर

काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माकडाचा मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये एक माकड टेबलावर पुशअप्स आणि सिटअप्स मारताना दिसत होता. या व्हिडिओ शेअर करीत त्यात रामदेव यांनी लिहिलं होतं की, “पाहा ज्यांना आपण यांना काही समजत नाही असं समजतो ते प्राणीही किती हुशार आहेत. त्यामुळे महामारी आणि आजारापासून वाचण्यासाठी रोज योगासनं करण्याचा संकल्प करा.”

हत्तीवर प्राणायम करताना पडल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल

यापूर्वी बाबा रामदेव यांनी हत्तीवर बसून प्राणायाम करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात खूपच व्हायरल झाला होता. मथुरा येथील रमणरेती आश्रमातील या व्हिडिओमध्ये बाबा रामदेव हत्तीवर बसून प्राणायाम करीत होते, त्याचक्षणी शांत उभ्या असलेल्या हत्तीने अचानक हालचाल केली आणि रामदेव यांचं नियंत्रण जाऊन ते खाली पडले. मात्र, आजूबाजूचे लोक त्यांना उचलायला धावले तोपर्यंत तेच स्वतः उठून उभे राहिले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हत्तीवर बसण्यावरुन काही वकिलांनी न्यू आग्रा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच वन्य जीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.