जगभरामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बातम्या समोर येत आहे. करोनावर मात करणाऱ्यांपासून ते या संकटाला धीराने सामोरे जाणाऱ्यांपर्यंत अनेकांचे किस्से आणि घटना बातम्यांमध्ये ऐकायला, पाहायला आणि वाचायला मिळत आहेत. असेच एक वृत्त सध्या इंडोनेशियामधून समोर आलं आहे. या देशामध्ये वस्तूच्या मोबदल्यात वस्तू देण्या-घेण्याची पारंपारिक पद्धत पुन्हा अंमलात आणली जात आहे. करोनामुळे अनेकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फीचे पैसे भरण्यासाठीही अडचणी निर्माण होत आहेत. याच समस्येवर उपाय शोधण्यासाठी इंडोनेशियाची राजधानी असणाऱ्या बालीमधील द वीन्स वन टुरिझम अकादमीने एक भन्नाट कल्पना शोधून काढलीय.  कॉलेज प्रशासनाने आता विद्यार्थ्यांकडून फीऐवजी नारळ जमा करण्यासाठी परवानगी दिली आहे. आता विद्यार्थ्यांकडून फी म्हणून पैशांऐवजी नारळ स्वीकारण्यास सुरुवातही झाली आहे. इंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणात नारळाचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे या कॉलेजमध्येही मोठ्या प्रमाणात नारळाचे उत्पादन घेतले जाते.

फी म्हणून पैशांऐवजी नारळ स्वीकारले जातील असा मजकूर असणारा ई-मेल कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांना पाठवला आहे. कॉलेज प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार फी म्हणून नारळ घेण्यास सुरुवात केली असून या नारळांपासून तेलाचे उत्पादन घेतलं जाणार आहे. जमा केलेल्या नारळांपासून पारंपारिक पद्धतीने तेल काढलं जाईल अशी माहिती या संस्थेमधील कर्मचारी असणाऱ्या वयन पसेक यांनी पुष्पा न्यूज या स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

वस्तूंची देवाण घेवाण करुन व्यवहार करण्याची पद्धत तशी तर खूपच जुनी आहे. चलनी नाण्यांचा शोध लागण्याआधी या पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. आजही जगातील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून व्यवहारासाठी ही पद्धत वापरली जाते. वस्तू किंवा सेवेच्या मोबदल्यात ग्राहक आणि विक्रेता एकमेकांना वस्तू किंवा सेवेच्या माध्यमातूनच सहकार्य करतात.

स्थानिक वृत्तपत्र ‘बाली सन’ने दिलेल्या वृत्तानुसार कॉलेजने केवळ नारळच नाही तर इतर नैसर्गिक गोष्टीही स्वीकारणार आहे. यामध्ये इतर वेगवेगळ्या औषधी झाडांच्या पानांचाही समावेश आहे. या पानांचा वापर साबण बनवण्यासाठी केला जातो. विद्यार्थी या वस्तूंपासून प्रोडक्ट तयार करुन ते विकू शकतात असंही कॉलेजने म्हटलं आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यापार आणि इतर गोष्टींबद्दलचे ज्ञान वाढते असं कॉलेजचं म्हणणं आहे. आधी आम्ही फीचे पैसे टप्प्याटप्प्यामध्ये देण्याची सूट दिली होती. मात्र आता आम्ही आधीपेक्षा अधिक सक्षम आणि विद्यार्थ्यांच्या फायद्याची नवीन यंत्रणा अंमलात आणली असून याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. करोनामुळे आम्ही आमच्या फी देण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल केला आहे. आम्ही नारळापासून तेलाचे उत्पादन घेतो. त्यामुळे विद्यार्थी फी म्हणून कॉलेजमध्ये नारळ जमा करु शकतात, असं कॉलेजने म्हटलं आहे.