‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन’ प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. भाजप सरकारने अहमदाबादमध्ये त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. शिंझो आबेंच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी रोड शो केला. या रोड शोचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

वाचा : एकेकाळी रस्त्यावर झोपणारा ‘तो’ तरुण आज कोट्यवधीचा मालक!

रस्त्याच्या दुतर्फा भारत आणि जपानचे राष्ट्रध्वज लावण्यात आले होते, पण त्याच्याही वर भाजपचे झेंडे लावण्यात आले होते. सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने हे फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप करून विरोधकांनी तीव्र शब्दांत सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकारानंतर ट्विटरवरही Anti_National_BJP हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. हा हॅशटॅग वापरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथील स्थानिक वृत्तपत्रांनीही यासंदर्भातील बातम्या दिल्या आहेत.  याआधी उत्तर प्रदेशमध्ये भाजप कार्यालयासमोरही असाच प्रकार पाहायला मिळाला होता. स्वातंत्र्य दिनी तिरंग्याच्याही वर पक्षाचा झेंडा लावण्यात आला होता. त्यामुळे योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीका झाली होती.

वाचा : जपानच्या फर्स्ट लेडीविषयीच्या या गोष्टी माहिती आहेत का?