करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर आता हळूहळू अनलॉकच्या माध्यमातून एक एक सेवा सुरु केली जात आहे. याच अनलॉकदरम्यान देशांतर्गत विमान प्रवास टप्प्याटप्प्यात सुरु करण्यात आला आहे. परदेशामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी वंदे भारत मोहिमेअंतर्ग विशेष विमानांनी नागरिकांना मायदेशी परत आणलं जात आहे. भारतामध्ये परतल्यावर या नागरिकांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारला जात आहे. मात्र या शिक्क्यासंदर्भातील तक्रारी आता नव्याने समोर येऊ लागल्या आहेत. यासंदर्भातील तक्रारीची दखल थेट केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी घेतली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी खासदार मधु गौड याक्षी यांनी रविवारी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन क्वारंटाइनचा शिक्का मारलेल्या हातांचे दोन फोटो ट्विट केले. “प्रिय हरदीप सिंह पुरीजी, परदेशातून स्वदेशात परतलेल्या नागरिकांच्या हातावर मारण्यात येणाऱ्या शिक्क्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांकडे तुम्ही जरा लक्ष द्याल का. काल माझ्या हातावर दिल्ली विमानतळावर हा शिक्का मारण्यात आला आणि आज बघा याची काय स्थिती झाली आहे,” अशी कॅप्शन याक्षी यांनी या फोटोंना दिली होती. या ट्विटमध्ये त्यांनी हरदीपसिंह पुरी यांनाही टॅग केलं होतं. या फोटोंमध्ये शिक्क्यामुळे त्वचा काळी निळी पडल्याचे दिसत आहे.

याक्षी यांनी केलेल्या ट्विटची दखल घेत हरदीपसिंह पुरी यांनी ट्विटरवरुन त्यांना रिप्लाय दिला. “या विषयाबद्दल मला माहिती देण्यासाठी मधु गौड याक्षीजी तुमचे आभार. मी यासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करेन,” असं पुरी यांनी म्हटलं आहे.

करोनाचा प्रादुर्भावर रोखण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने हे नवे नियम लागू केले आहेत. यानुसार परदेशातून भारतात आलेल्या लोकांच्या हातावर नीळ्या रंगांच्या शाईने क्वारंटाइनचा शिक्का मारला जातो. क्वारंटाइनच्या कालावधीमध्ये या व्यक्तींना घराबाहेर पडू नये आणि पडले तरी त्यासंदर्भातील माहिती लगेच कळावी म्हणून हा शिक्का मारण्यात येतो.