तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराचा आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे. इंटरनेट आणि मोबाइलमुळे जग जवळ आले असे म्हणत असताना माणसे मात्र एकमेकांपासून दुरावली असल्याचे आपल्याला जागोजागी दिसते. आपली मुले सतत मोबाइलवर असल्याने भडकणारे आई-बाबा आपण कायमच पाहतो. मोबाइलशिवाय काही सुचत नाही, आग लाव त्या मोबाइलला असे संवाद आपण सध्या घरोघरी ऐकत असतो. यामध्ये सोशल नेटवर्कींग साइटसवर सर्फिंग करण्यापासून ते सतत सेल्फी काढणे, गेम खेळणे यांसारखे अनेक उद्योग सुरु असतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच हे फॅड पहायला मिळते. त्यामुळे अनेकदा लहान मुले आपले बालपणही हरवून बसतात. याहूनही वाईट गोष्ट म्हणजे मोबाईलच्या या वेडामुळे ही लहान मुले आई-वडिलांसोबत पुरेसा वेळ घालविणे मिस करतात.
यावरच उपाय म्हणून अमेरिकेतील एका वडिलांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. जस्टीन स्मिथ (जॉय) नाव असलेल्या वडिलांनी आपल्या मुलांशी संवाद साधण्यासाठी यु-ट्यूब चॅनेल सुरु केले आहे. त्याची मुले सतत यु-ट्यूबवर असल्याने त्याने हा उपाय शोधून काढला आहे. त्याने आपल्या चॅनेलला जॉय डॅडीट्यूब असे नावही दिले आहे. ३० मार्च रोजी त्याने आपला पहिला व्हिडिओ पोस्ट केला असून हा चॅनेल सुरु करण्यामागचा उद्देश त्याने यामध्ये सांगितला आहे. पहिल्या व्हिडिओनंतर जॉय यांच्या मित्राने त्यांना हा व्हिडिओ योग्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी आपल्या दोन मुलींना व्हिडिओच्या फ्रेममध्ये घेऊन त्याचे शूटींग केले आहे.
सध्या मुले इंटरनेटच्या मायाजालात अडकत चालले आहेत. आपण पाहत असलेल्या गोष्टी योग्य आहेत की अयोग्य हे त्यांना कळत नाहीये असे जॉय यांनी सांगितले. त्यामुळे जॉय आपल्या मुलांशी कनेक्ट होण्यासाठी करत असलेले प्रयत्न खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहेत असेच म्हणावे लागेल. मात्र त्याच्या या प्रयत्नांचा कितपत प्रयत्न होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.