मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी ‘दख्खनची राणी’ म्हणजे ‘डेक्कन क्वीन’ सर्वात आवडती होय. ही ट्रेन आता ८९ व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. चला तर मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी ‘सेकंड होम’ असलेल्या ट्रेनबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.

– १ जून १९३० रोजी ही रेल्वे पहिल्यांदा धावली. त्यापूर्वी ही रेल्वे कल्याण ते पुणे धावत होती. त्यानंतर आताच्या सीएसटीपर्यंत ती धावायला लागली. डेक्कन क्वीनला सुरूवातीला प्रथम आणि द्वितीय श्रेणीचे डब्बे जोडले होते. १९४९ मध्ये प्रथम श्रेणीचा डब्बा हटण्यात आला त्यानंतर द्वितीय श्रेणीच्या डब्ब्याची पूर्नरचना करून त्याला प्रथमश्रेणीचं रुप देण्यात आलं. १९५५ मध्ये या एक्स्प्रेसला तृतीय श्रेणीचा डब्बाचा जोडण्यात आला.

– डेक्कन क्वीन ही त्याकाळातील आशियातील सर्वात वेगवान रेल्वे होती. या गाडीला एकूण १७ डब्बे आहेत. त्यापैकी एक डब्बा महिलांसाठी राखीव, दोन वातानुकूलित, यातील काही डबे पास धारकांसाठी राखीव आहेत. पास धारकांसाठी ही गाडी अपवादात्मक आहे. १२० कि.मी पुढे गाडी जात असेल तर त्यासाठी पास देण्यात येत नाही. मात्र, डेक्कन क्वीनला यातून वगळण्यात आले आहे.

– महिलांसाठी पहिल्यांदा या रेल्वेमध्ये आरक्षित डब्बा ठेवण्यात आला. तसेच देशातील पहिली विद्युतीकरणावर चालणारी रेल्वे आणि आयएसओ क्रमांक मिळवणारी रेल्वे ठरली आहे.

– दरवर्षी १ जूनला रेल्वे प्रवासी ग्रुपसह प्रवाशांच्या वतीने गाडीचा न चुकता वाढदिवस साजरा केला जातो. एखाद्या ट्रेनचा न चुकता वाढदिवस साजरा करणं ही दुर्मिळच गोष्ट असेल.

– या गाडीची डायनिंग कारही तितकीच लोकप्रिय आहे. सकाळी घरी चहा-नाश्ता न करता गाडीतच त्याचा आस्वाद घेणाऱ्यांमुळे प्रवाशांसाठी ही गाडी ‘सेकंड होम’च ठरली. गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थ आणि आपुलकीच्या सेवेमुळे डेक्कन क्वीनमधील खानपान सेवा इतर कोणत्याही गाड्यांच्या तुलनेत सरस आहे. या डायनिंग कारमध्ये मायक्रोव्हेव, डिप फ्रिजर, टोस्टर यांसारख्याही सुविधा देण्यात आल्या आहेत.