टेस्ला कंपनीचा सीईओ इलॉन मस्क सोशल नेटवर्किंगवर प्रचंड अ‍ॅक्टीव्ह आहे. अनेकदा तो त्याच्या ट्विट्समुळे चर्चेत असतो. सध्या तो नासा आणि स्पेस एक्सच्या संयुक्त मोहिमेसंदर्भातील बातम्यांबरोबरच अशाच एका अचानक केलेल्या ट्विटमुळे चर्चेत आहे. या ट्विटमुळे त्याला थेट इजिप्तमध्ये येण्याचं आमंत्रण मिळालं असून सारं प्रकरण हे इजिप्तमधील गाझा येथील पिरॅमिड्स आणि परग्रहवासियांचा संबंध असण्यासंदर्भातील ट्विटवरुन घडलं आहे.

नक्की वाचा >> एलियन्स आहेत का? “होय! कदाचित पृथ्वीवरच आहेत; फक्त…”

झालं असं की, इलॉनने शुक्रवारी म्हणजेच ३१ जुलै रोजी एक ट्विट केलं. यामध्ये त्याने इजिप्तमधील पिरॅमिड्स ही परग्रहवासियांनी म्हणजेच एलियन्सने बांधल्याचं म्हटलं होतं. “एलियन्सने पिरॅमीड्स बांधली हे सहाजिक आहे,” असं पाच शब्दांचं ट्विट इलॉनने केलं होतं. हे ट्विट प्रचंड व्हायरल झालं. ८६ हजारहून अधिक जणांनी ते रिट्विट केलं असून यावर २५ हजारहून अधिक जणांनी आपलं मत नोंदवलं आहे.

नक्की वाचा >> २०२० मध्ये एलियनही सापडणार? चीनच्या नव्या मोहिमेला सप्टेंबरपासून सुरुवात

इलॉनच्या या ट्विटवर इजिप्तच्या परराष्ट्र संबंध मंत्रालयाच्या रानिया अल-मशत यांनीही रिप्लाय केला आहे. त्यांनी टेस्लाच्या कार्यकारी अध्यक्ष असणाऱ्या इलॉनला इजिप्तला येण्याचं आमंत्रण दिलं आहे. येथे येऊन तुम्हीच पिरॅमिड्स पाहा आणि आमच्या इतिहासाबद्दल जाणून घ्या अशी ऑफरच रानिया यांनी दिली आहे. “मी तुमच्या कामाची मोठी समर्थक आहे. मी तुम्हाला आणि स्पेस एक्सला पिरॅमिड्स कसे बांधले यासंदर्भातील लेख वाचण्यासाठी आणि पिरॅमिड्समधील थडक्यांचा अभ्यास करण्यासाठी आमंत्रित करते. मिस्टर मस्क आम्ही तुमची वाट पाहत आहोत,” असं रानिया यांनी ट्विट केलं आहे.

इलॉनने आपल्या या ट्विटखाली बीबीसीच्या एका लेखाची लिंकही शेअर केली असून त्यामध्ये पिरॅमिड्ससंदर्भातील माहिती आहे. मात्र इलॉनच्या या ट्विटमुळे अमेरिकेपेक्षा इजिप्तमध्ये चर्चांना उधाण आल्याचं दिसत आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार या पिरॅमिडमधील थडगं शोधून काढणारे झाई हवास या पुरातत्वशास्त्रज्ञांने इलॉन संभ्रमावस्थेत असल्याचे म्हटले आहे. “मला जी थडगी सापडली आहेत आणि मी जे संशोधन केलं आहे त्यावरुन पिरॅमिड्स हे इजिप्तशियन लोकांनीच बांधलेत आणि हे बांधणारे लोकं हे मजूर नव्हते,” असं हवास म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> खगोलशास्त्रज्ञ म्हणतात, “आपल्याच आकाशगंगेत एलियन्सच्या ३० वसाहती असण्याची शक्यता”

प्राचीन काळातील समृद्ध अशा इजिप्तमधील ऐश्वर्यसंपन्न राजे ऐषोआरामात जगत. तर त्यांच्या मृत्यूनंतरदेखील दिमाखदार अशा भव्य कबरी बांधण्यात आल्या. खुफू राजाचा पिरॅमिड जगातील सात आश्चर्यामधला एक मानला जातो. कैरोमधील गिझा भागात अजूनही पाच भव्य पिरॅमिड्स चांगल्या अवस्थेत आहेत. पिरॅमिड्सचे लोण पुढे अरबस्तानात पसरत गेले आणि वेगवेगळ्या देशांत पिरॅमिड्सची निर्मिती होत गेली. पण त्यातील सर्वात मोठा पिरॅमिड फारोह खुफूचा आहे. तो ४५० फूट उंच असून त्याचे क्षेत्रफळ २५० मी. आहे. या अवाढव्य कामासाठी दोन-दोन टन वजनाचे दगड लाखांच्या संख्येने लागले. ते तिथे कसे आणले असतील यासंदर्भात मतमतांतरे आहेत. हे पिरॅमिड्स हे एलियन्सने बांधल्याचा दावा काही शास्त्रज्ञ करतात.