लॉर्डस क्रिकेट मैदानावर अतिशय रोमांचक अशा अंतीम सामन्यामध्ये इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय मिळवत पहिल्यांदाच विश्वविजेता होण्याचा मान पटकावला. विश्वचषक स्पर्धेमध्ये ४४ वर्षांनंतर प्रथमच इंग्लंडने जेतेपदावर नाव कोरण्याचा भीमपराक्रम अंतीम सामन्यामध्ये केला. शेवटच्या अर्ध्या तासामध्ये सामन्याला अनेक कलाटणी देणाऱ्या घडामोडी मैदानात घडल्या. यामध्ये दोन्हीकडील खेळाडूंने सामन्याचे पारडे आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरच्या क्षणी सुपर ओव्हरमध्येही समान धावसंख्या झाल्याने सामन्यात सर्वाधिक चौकार आणि षटकार लगावणाऱ्या संघाला म्हणजेच इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले. मात्र या महत्वाच्या सामन्याचा निर्णय चौकार षटकारांच्या निकषावर लावल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सेलिब्रिटीजपासून ते सामान्यांपर्यंत अनेकांनी इंग्लंड आणि न्यूझीलंड संघाला विश्वविजेता पद विभागून दोन्ही संघाना चषक द्यायला हवा होता असे मत नोंदवले. मात्र महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वोसर्वा आनंद महिंद्रा यांनी इंग्लंड संघानेच विश्वचषक घेताना मनाचा मोठेपणा दाखवत न्यूझीलंडच्या संघाला मंचावर आमंत्रित करायला हवे होते असे मत व्यक्त केले आहे.

क्रिकेटची पंढरी म्हणवल्या जाणाऱ्या लॉर्डस क्रिकेट मैदानावर इंग्लंडचा संघ पहिल्यांदाच विश्वविजेता ठरला खरा पण या निकालानंतर क्रिकेटच्या नियमांवर जोरदार टिका होताना दिसत आहे. काहींनी क्रिकेटचे नियम जिंकल्याचे मत व्यक्त केले आहेत तर काहींनी आयसीसीला मिम्सच्या माध्यमातून लक्ष्य केले आहे. त्यातच दोन्ही संघांचा खेळ पाहता दोन्ही संघांना विजयी घोषित करायला हवे होते असे मत नोंदवले आहे. मात्र विजेता एकच असला तरी इंग्लंडने मनाचा मोठेपणा दाखवायला हवा होता असं मत आनंद महिंद्रांनी व्यक्त केले आहे.

आनंद महिंद्रा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘क्रिकेटच्या नियमांसंदर्भात कितीही प्रश्न उपस्थित केले तरी भूतकाळात जाऊन चौकार-षटकारांच्या आधारे घेण्यात आलेला निर्णय बदलणे कठीण आहे. पण इंग्लंडच्या संघाने न्यूझीलंडच्या संघातील खेळाडूंना विश्वचषक स्वीकारताना मंचावर बोलवून दोन्ही संघांचा विश्वचषकाबरोबर फोटो काढून घेतला असता तर?’

आनंद महिंद्रांच्या या ट्विटवर अनेकांनी इंग्लंडने खरचं असं करायला हवं होतं असं मत नोंदवलं आहे. आनंद महिंद्रांच्या ट्विटला उत्तर देणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांचाही समावेश असून त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भोगले म्हणतात, ‘खरंच इंग्लंडन असे केले असते तर छान झाले असते. असं खरचं झालं असतं तर अगदी चांगल्याप्रकारे खेळाचा सन्मान करत खेळणाऱ्या विरोधी संघाच्या प्रयत्नांची नोंद घेतल्यासारखं वाटलं असतं’

दरम्यान दुसरीकडे न्यूझीलंडचा सलग दुसऱ्या विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात पराभव झाल्याने त्यांना उप-विजेते पदावर समाधान मानावे लागले आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.