जगभरामधील करोनाचा प्रादुर्भाव मागील तीन महिन्यांपासून कमी झाल्याचे चिन्ह दिसत नाहीय. रोज करोनाबाधितांचे आकडे वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजे घरुन काम करण्याची मूभा दिली आहे. अनेक कर्मचारी आजही घरुनच काम करत असतानाच आता फेसबुकने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमची मर्यादा जुलै २०२१ पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे फेसबुकचे कर्मचारी पुढील १० महिने घरुन काम करु शकतात. यापूर्वी ही मुदत दोनदा वाढवण्यात आली आहे. ही मुदत वाढवण्याआधी २०२० संपेपर्यंत कमर्चाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगण्यात आलं होतं.

फेसबुकच्या प्रवक्त्यांच्या वक्तव्याच्या आधारे मागील आठवड्यामध्ये द वर्जने दिलेल्या वृत्तामध्ये आरोग्य आणि सरकारी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही काही निर्णय घेतले आहेत. यामध्ये अंतर्गत चर्चेनुसार आम्ही कर्मचाऱ्यांना जुलै २०२१ पर्यंत घरुन काम करण्याची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी २०२१ जुलैपर्यंत ऑफिसला न येता घरुनच काम केले तरी कंपनीला काहीच अडचण नाहीय.

नक्की पाहा >> Work From Home मुळे दिवसभर बसून काम करताय? ‘हे’ व्यायाम नक्की करा

ऑफिससाठी लागणाऱ्या गोष्टी घेण्यासाठी अतिरिक्त निधी

घरुन काम करण्याच्या सुविधेबरोबरच कंपनी कर्मचाऱ्यांना घरी ऑफिसच्या कामासाठी आवश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी अतिरिक्त निधीही देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. फेसबुक घरुन काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एक हजार डॉलर म्हणजे अंदाजे ७३ ते ७४ हजार रुपये देणार आहे. या पूर्वी गुगल आणि ट्विटरसारख्या मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची सूट दिली आहे.

भारतामध्ये ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली मर्यादा

भारतामध्येही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची मर्यादा ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा सरकारने २१ जुलै रोजी केली. या घोषणेनुसार माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी आणि बीपीओ कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत घरुनच काम करता येणार आहे. वर्क फ्रॉम होमची मर्यादा ३१ जुलै रोजी संपत होती. मात्र त्याआधीच ही मुदत पाच महिन्यांनी वाढवली आहे. यासंदर्भातील माहिती दूरसंचार विभागाने २१ जुलै रोजी रात्री ट्विटरवरुन दिली आहे. “करोनाच्या पार्श्वभूमीवर दूरसंचार विभागाने घरुन काम करण्यासंदर्भातील अटी आणि नियमांमध्ये ३१ डिसेंबर २०२० पर्यंत शिथिल करण्यात आल्या आहेत,” असे ट्विट दूरसंचार विभागाने केलं होतं.

नक्की वाचा >> “कायम घरुनच काम केलं तर…”; सत्या नाडेलांचा ‘पर्मनन्ट वर्क फ्रॉम होम’ला विरोध

या शहरातील आयटी कर्मचाऱ्यांना फायदा

भारतामध्ये आयटी क्षेत्रातील ८५ टक्के कर्मचारी सध्या घरुनच काम करत आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेसंदर्भातील कर्मचारी कार्यालयांमध्ये जाऊन काम करत आहेत. भारतामधील आयटी क्षेत्रातील प्रमुख केंद्र असणाऱ्या बंगळुरु, हैदराबाद, मुंबई, दिल्ली एनसीआर, पुणे यासारख्या शहरांमध्ये करोनाचा प्रभाव अधिक असल्याने या सवलतींचा कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.