अंतराळात लवकरच जगातील पहिलं वहिलं आलिशान हॉटेल सुरू होणार आहे. अमेरिकातल्या ओरियन स्पॅन कंपनीनं याची घोषणा केली आहे. २०२२ मध्ये हे हॉटेल सामान्य लोकांसाठी सुरु होणार आहे. त्यासाठी कंपनीनं तयारीही सुरू केली आहे. ही कल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर अंतराळात जाण्याचं, तिथे राहण्याचं सामान्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

पृथ्वीपासून दूर असणाऱ्या या हॉटेलमध्ये क्र्यू मेंबरसह सहा जणं राहू शकतात. एकूण १२ दिवस या हॉटेलमध्ये राहता येणार आहे. परग्रहांवर मानवी वस्ती वसवण्याचा प्रयोग सुरू आहे, सामान्य लोकांना अंतराळातील उद्भूत अनुभव घेण्याची संधी आम्हाला द्यायची आहे. येथे नक्कीच त्यांना एका अंतराळवीरासारखा अनुभव घेता येणार असल्याचं ओरियन स्पॅनचे कार्यकारी अधिकारी फ्रँक बंगर म्हणाले. अर्थात हा अनुभव फक्त निवडक जाणांना घेता येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ग्राहकांच्या अर्जाची कसून तपासणी आणि इतर चाचण्या झाल्यानंतरच त्यांना या आलिशान हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळेल अशी माहिती त्यांनी दिली.

यासाठी खर्चही तितकाच मोठा येणार आहे. एका रात्रीसाठी ७, ९१, ६६६ डॉलर म्हणजे जवळपास ५ कोटी १४ लाख मोजावे लागणार आहेत. यासाठी ५० लाख रुपये ग्राहकांना आधीच कंपनीकडे जमा करावे लागणार आहे. जर काही अपरिहार्य कारणानं बुकिंग रद्द झालं तर ग्राहकाला त्याचे पैसे परत मिळणार आहे. थोडक्यात १२ दिवस या हॉटेलमध्ये राहण्यासाठी एका ग्राहकाला जवळपास ६१ कोटी एवढी गडगंज रक्कम मोजावी लागणार आहे. ओरियन स्पॅन ने हॉटेलला ‘अयूरोरा स्टेशन’ नाव दिलं आहे. हॉटेलमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना याआधी खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.