काश्मीरच्या प्रश्नावरून भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी या दोघांमध्ये ट्विट युद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीरमध्ये रविवारी लष्कराने दहशतवादविरोधी अभियानाअंतर्गत १३ दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने एकीकडे पाकिस्तानी सरकारने दुःख व्यक्त केलं असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीनेही ट्विट करून दहशतवाद्यांसाठी सहानुभूती व्यक्त केली होती. त्यानंतर भारताच्या गंभीरने शेलक्या शब्दांत आफ्रिदीच्या ट्विटचा समाचार घेतला. पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर रात्री उशीरा पुन्हा एकदा आफ्रिदीने गंभीरने केलेल्या टीकेला अप्रत्यक्षरित्या प्रत्युत्तर दिलं आहे.

आफ्रिदीने भारताच्या ध्वजासोबतचा स्वतःचा एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो ट्विट करताना त्याने, ‘आम्ही सर्वांचा आदर ठेवतो, आणि हा फोटो त्याचं चांगलं उदाहरण आहे. पण जेव्हा मानवाधिकाराचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही आमच्या निरपराध काश्मिरींसाठीही सन्मानाची अपेक्षा ठेवतो’ असं म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात स्वित्झर्लंड येथे झालेल्या एका प्रदर्शनीय सामन्यानंतर आफ्रिदीने भारतीय चाहत्यासोबत हा फोटो काढला होता, त्या वेळी हा फोटो व्हायरल झाल्यानंतर भारतीयांनी आफ्रिदीवर कौतुकाचा वर्षाव केला होता. पण आता तोच फोटो ट्विट करून आफ्रिदीने गंभीरला अप्रत्यक्षरित्या उत्तर दिलं आहे.

कशी झाली वादाला सुरूवात –
‘भारतव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती अस्वस्थ करणारी आणि चिंताजनक आहे. आवाज दाबण्यासाठी दडपशाहीचा अंमल करणा-या शासनाकडून निर्दोषांची हत्या केली जात आहे. संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना कुठे आहेत? हा रक्तरंजित संघर्ष रोखण्यासाठी ते प्रयत्न का करत नाहीयेत?’ असा सवाल आफ्रिदीने ट्विटरद्वारे केला होता.

त्याला उत्तर देताना गंभीरने ‘प्रसारमाध्यमांनी शाहीद आफ्रिदीच्या ट्विटवर प्रतिक्रिया घेण्यासाठी मला फोन केले. त्यात काय प्रतिक्रिया द्यायची? शाहीद आफ्रिदी फक्त UN कडे पाहत आहे, कारण त्याच्या डिक्शनरीत त्याचा अर्थ “UNDER NINTEEN” असा आहे. मीडियाने शांतपणे घ्यावं. आफ्रिदी नो बॉलवरील विकेट साजरा करत आहे’.असं खोचक ट्विट केलं.

गौतम गंभीरने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘प्रसारमाध्यमांनी शाहीद आफ्रिदीच्या ट्विटवर प्रतिक्रिया घेण्यासाठी मला फोन केले. त्यात काय प्रतिक्रिया द्यायची? शाहीद आफ्रिदी फक्त UN कडे पाहत आहे, कारण त्याच्या डिक्शनरीत त्याचा अर्थ “UNDER NINTEEN” असा आहे. मीडियाने शांतपणे घ्यावं. आफ्रिदी नो बॉलवरील विकेट साजरा करत आहे’.