आपल्या विद्यार्थ्यांना शिकवताना काही शिक्षक किती मेहनत घेतात नाही का? म्हणजे बघा ना त्या विद्यार्थ्यांला एखादा धडा, गणितं, प्रमेय, व्याकरण काहीही अडलं तरी ते त्याला समजेपर्यंत काही शिक्षक त्या विद्यार्थ्यांवर मेहनत घेतात. आता प्रत्येक शिक्षकांची शिकवण्याची पद्धतही वेगळी असते. काहींना विद्यार्थ्यांशी शिस्तीनं वागायला आवडतं तर काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलेनं घेत त्याचं मित्र होऊन एखादा विषय शिकवण्याचा प्रयत्न करतात. काहींना पुस्तकातले धडे नुसते वाचून दाखवायला आवडतात तर काहींना विविध उदाहरणं, दाखले देऊन ते विद्यार्थ्यांना पटवून द्यायला आवडतं. पण काही विषय असे असतात जिथे शिक्षकांचा खरा कस पणाला लागतो. तर असा कस पणाला लागलेल्या घाना मधल्या शिक्षकाचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

हा शिक्षक विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट वर्ड शिकवत होता. परंतु समोर कॉम्प्युटर नसल्यानं विद्यार्थ्यांना काही ते वाचून समजणार नव्हतं म्हणूनच एमएस वर्डचे धडे देण्यासाठी या शिक्षकांनी चक्क फळ्यावर मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन झाल्यावर कसं दिसतं हे खडूने काढून दाखवलं. एमएस वर्डमधले मेन्यू या शिक्षकाने फळ्यावर काढले. आपल्या विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडओळख करून देताना त्यानं केलेली ही धडपड अनेकांना खूप आवडली. घाना हा गरिब देशांपैकी एक आहे. इथल्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे थोड्या थोडक्या सुविधांचा वापर करून शिक्षक जमेल तसे या विद्यार्थ्यांना शिकवायचा प्रयत्न करतात. या शिक्षकानं सोशल मीडियावर हा फोटो शेअऱ केला होता. विद्यार्थ्यांना शिकवण्याची त्याची धडपड पाहून अनेकांनी या शिक्षकाचं कौतुक केलं आहे.