आपल्या प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज करण्याच्या नादात एका तरुणाचा दूर्देवी मृत्यू झाल्याची घटना टांझानियामध्ये समोर आली आहे. येथील पेंम्बा बेटावर पर्यटनासाठी आलेल्या स्टीव्ह वेबरने आपल्या प्रेयसीला लग्नाची मागणी घालण्यासाठी पाण्यात जाऊन प्रोपज करण्याचा प्लॅन आखला होता. मात्र दूर्देवाने यामध्ये स्टीव्हचा बुडून मत्यू झाला. त्याची प्रेयसी केनेशा अँटॉइन हिने आपल्या फेसबुक पोस्टमधून या दूर्घटनेची माहिती दिली आहे.

स्टीव्ह आणि केनेशा सुट्ट्यांसाठी पेंम्बा बेटावर गेले होते. तेथेच आपण केनेशाला आगळ्यावेगळ्या पद्धतीने लग्नाची मागणी घालावी या हेतूने राहण्यासाठी स्टीव्हने सबमर्ज केबीन म्हणजेच पाण्याच्या आतमध्ये असणारी खोली बूक केली. दुसऱ्या दिवशी सकाळी स्टीव्हने ऑक्सिजन टँक न लावता श्वास रोखून पाण्यात उडी मारली आणि तो पाण्यामधून त्या केबिनच्या काचेच्या खिडकीजवळ आला. त्याने स्वत:च्या हाताने लिहिलेले प्रेमपत्र या खिडकीच्या बाहेरुन दाखवले. ‘तुझ्याबद्दल मला काय काय आवडते एवढं मी एकदा श्वास रोखून सांगू शकत नाही. पण मला तुझ्याबद्दल जे काही आवडतं त्यात दिवसोंदिवस भर पडत आहे,’ असं या खिडकीमधून स्टीव्हने दाखवलेल्या पत्रात लिहिले होते. प्रेमपत्र दाखवून झाल्यानंतर त्याने तिला पाण्यामधूनच रिंग दाखवली. केनेशानेही केबीनमधून त्याला होकार दिला. मात्र त्यानंतर स्टीव्ह पाण्यातून बाहेर आलाच नाही. त्याचा बुडून मृत्यू झाला.

स्टीव्हने केलेल्या या हटके प्रपोजलचा व्हिडिओ शेअर करत केनेशाने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. ‘या प्रपोजलनंतर आम्हाला कधीच एकमेकांना मिठी मारता आली नाही. आमच्या नवीन आयुष्याची एकत्र सुरुवात करता आली नाही. आमच्या आयुष्यात सर्वात अविस्मरणीय दिवस सर्वात भयंकर दिवस ठरला,’ असं केनेशाने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘तू त्या पाण्यामधून कधी वर येऊ शकला नाही. त्यामुळे तुला प्रत्यशात माझे उत्तर ऐकायला मिळाले नाही. पण माझे उत्तर लाखो वेळा हो हो हो असेच आहे. मी तुझ्याशी लग्न करेन,’ असं केनेशाने पोस्टच्या शेवटी म्हटले आहे.

सीएनएनला दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पोलिसांनी एक अमेरिकन पर्यटकाचा बुडून मत्यू झाला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे, मात्र यासंदर्भात कोणतीही अधिक माहिती त्यांनी दिलेली नाही.