प्रत्येक धर्माचे आणि पंथाचे काही नियम असतात. काही जणांकडून या नियमांचे कट्टरपणे पालन केले जाते. आपल्या दैनंदिन धर्मकार्यात कुणी बाधा आणायचा प्रयत्न केल्यास हे लोक कोणत्याही गोष्टीचा त्याग करू शकतात. इस्रायलमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे याचा प्रत्यय आला.
ईस्रायलमधील आरोग्य मंत्र्यांना त्यांच्या धर्माच्या पवित्र दिवशी सुटी न देता काम करायला लावल्याने त्यांनी पंतप्रधानांकडे आपल्या पदाचा थेट राजीनामाच दिला आहे.

आता इतके काय झाले की ,त्यांनी थेट राजीनामा द्यावा. तर ज्यू धर्मामध्ये ‘सबाथ’ हा पवित्र काळ मानला जातो. या काळात काम न करता आराम करायचा असतो असे धर्मात सांगितले आहे. या दिवशी काम करणे धर्माच्या दृष्टीने अयोग्य आहे. मात्र, यादिवशी याकोव लिजमन यांना कामावर बोलविण्यात आले. आपल्या धर्मातील नियमाचे उल्लंघन झाल्याने लिजमन वैतागले आणि त्यांनी थेट राजीनामाच दिला. ते युनायटेड तोरा या एका रुढीवादी पक्षाचे प्रमुख नेते आहेत.

‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांना सबाथच्या दिवशी रेल्वेशी निगडीत एका कामासाठी बोलविण्यात आले. त्यामुळे लिजमन चिडले आणि त्यांनी राजीनामा दिला. याबाबत नेतन्याहू म्हणाले, रेल्वेशी निगडीत काम नागरीक आणि सरकारच्यादृष्टीने महत्त्वाचे असल्याने इतर नेत्यांबरोबर लिजमन यांना बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांनी दिलेल्या राजीनाम्याचा विचार करुन या घटनेवर योग्य तो तोडगा काढण्यात येईल. नेतन्याहूंना सत्तेमध्ये राहण्यासाठी लिजमनच्या पार्टीचे समर्थन गरजेचे आहे. या पक्षाने पाठिंबा काढल्यास सरकार संकटामध्ये येऊ शकते.