अवैधरित्या खाणकाम केल्याप्रकरणी साडे तीन वर्षे तरुंगवास भोगलेले भाजपाचे माजी मंत्री जर्नादन रेड्डी यांच्या मुलीचा आज लग्नसोहळा आहे आणि या लग्नसोहळ्यासाठी रेड्डीनी जवळपास ५०० कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा काल देशभरातील अनेक माध्यमांत झाली. एकीकडे ५०० आणि १००० च्या नोट चलनातून बाद झाल्यानंतर सर्वसामान्य माणसांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. अनेकांच्या दिवसाची सुरूवातच बँकेच्या दारातून होत आहे. खिशात पैसे असतानाही पैशांची चणचण भासू लागली आहे पण याचा दूर दूरपर्यंत कोणताच परिणाम भाजपाच्या माजी नेत्यांवर झाला नसल्याचे दिसून येत आहे.

१२ नोव्हेंबर पासून सुरू असलेला हा विवाहसोहळा आज संपणार आहेत. या सोहळ्यासाठी जवळपास ३० हजारांहून अधिक व-हाडी मंडळी येणार असून त्यांच्या सुरक्षेसाठी ३ हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. इतकेच नाही तर रेड्डी यांनी आपली मुलगी ब्राम्हणी हिच्या कपड्यांवरच जवळपास १७ कोटी रुपये आणि दागिन्यांवर ९० कोटींच्या आसपास पैसे खर्च केल्याची बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. या विवाह सोहळ्यातील विधीसाठी खास कृष्णदेवराय यांच्या महलाची, हम्पी येथील विजय विठ्ठल मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. लग्नात आपल्या मुलीला माहेरची आठवण येऊ नये यासाठी रेड्डी यांनी खास आपल्या घराची देखील प्रतिकृती उभारली आहे. आंध्रप्रदेशमधल्या प्रसिद्ध उद्योपती राजीव रेड्डी ह्याच्याशी ब्राम्हणी विवाहबंधनात अकडणार आहे.

येथील स्थानिक वृत्तपत्राचा माहितीनुसार लग्नात उपस्थित राहणा-या व-हाडी मंडळींना प्रवेशद्वारापासून ते लग्नमंडपात घेऊन जाण्यासाठी बैलगाड्या ठेवण्यात आल्या आहेत. या बैलगाड्यांची आलीशान पद्धतीने सजावट करण्यात आली आहे. महिन्याभरापूर्वी रेड्डी यांच्या मुलीची लग्न पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या लग्नपत्रिकेत एलसीडी स्क्रिन बसवण्यात आली होती. जगातील महागडी आणि आधुनिक प्रकाराने ही पत्रिका बनवण्यात आली होती.

 वाचा : VIDEO : मंत्र्याच्या मुलीची महागडी लग्नपत्रिका