20 February 2019

News Flash

आठवतंय का? सचिन तेंडुलकरने वासिम अक्रमच्या गोलंदाजीवर आज घेतला होता कॅच

विल्स भारत पाकिस्तान इलेवन हा संघ खेळला श्रीलंकेविरुद्ध

इतिहासातले काही क्षण चमत्कारिक असतात, ज्यांच्यावर नंतर विश्वास ठेवणं कठीण जातं. भारत व पाकिस्तान यांनी एकमेकांशी मालिका खेळणं 1989 पासून बंद केलंय. परंतु 1996मध्ये असा चमत्कारिक योग जुळून आला की भारत व पाकिस्तानचे खेळाडू एका संघातून श्रीलंकेविरुद्ध खेळले होते ते ही आजच्या दिवशी 13 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेमध्ये…

त्याचं झालं होतं असं, भारत, श्रीलंका व पाकिस्तानात संयुक्त विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्रीलंकेमध्ये सामने होते ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिजचे. परंतु सुरक्षेच्या कारणामुळे या देशांनी या श्रीलंकेतील सामन्यांस नकार दिला. अखेर चाहत्यांची निराशा होऊ नये म्हणून श्रीलंकेच्या टीमशी भारत व पाकिस्तानचा संयुक्त संघ खेळेल का अशी विचारणा झाली आणि त्यास चक्क दोन्ही संघांनी अनुमती दर्शवली. त्यावेळी हिंसक कारवायांनी वेढलेल्या श्रीलंकेसाठी जगभरात सकारात्मक संदेश जाणे गरजेचे होते. या उद्देशाला भारत व पाकिस्तान दोन्ही देशांनी पाठिंबा दर्शवला आणि संयुक्त संघ करण्याचा निर्णय झाला. मग काय तयार झाली एक स्वप्नवत टीम.. या विल्स भारत पाकिस्तान इलेवन असं नाव ठेवलेल्या संघात होते सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरूद्दीन, वासिम अक्रम, वकार युनुस, अनिल कुंबळे, आमिर सोहेल, अजय जाडेजा, सईद अन्वर, ईजाझ अहमद असे खेळाडू. त्यामुळे वासिम अक्रम व सचिन तेंडुलकरसारख्या महान फलंदाजांना एकाच संघातून खेळताना बघण्याचे भाग्य क्रीडा रसिकांना लाभलं.

श्रीलंकेचा डाव भारत पाकिस्ताननं 168 मध्ये गुंडाळला. वकार युनूसनं जयसुर्याला बाद केलं. आणि त्यानंतर वासिम अक्रमनं रोमेश कालुविथारनाला झेल द्यायला भाग पाडलं, जो घेतला सतिन तेंडुलकरनं. त्यामुळे वासिम अक्रमच्या गोलंदाजीवर सचिन तेंडुलकरनं घेतलेला झेल असं आधी कधी न घडलेलं व पुन्हा कधीही बघायला मिळणार नाही असं दृष्य श्रीलंकेमध्ये क्रीडा रसिकांना बघायला मिळालं. विशेष म्हणजे या सामन्यात सर्वाधिक धावा सचिन तेंडुसकरनं फटकावल्या, त्या होत्या 36 तर सर्वाधिक चांगली गोलंदाजी केली अनिल कुंबळेनं. कुंबळेनं आठ षटकांमध्ये 12 धावा देत 4 गडी बाद केले.

भारत पाकिस्तानच्या संयुक्त संघानं श्रीलंकेला 35 व्या षटकात 4 गडी राखत हरवलं. हा सामना प्रदर्शनीय होता, परंतु भारत पाकिस्तानचे संबंध ताणले गेले असताना व दोन्ही देशांमध्ये खेळ होत नसताना अडचणीच्या वेळी दोन्ही संघातले दिग्गज खेळाडू एकत्र आले आणि एका संयुक्त संघातून खेळले, 13 फेब्रुवारी 1996 या दिवशी…

First Published on February 13, 2018 4:15 pm

Web Title: kaluvitharnana caught by sachin tendulkar bold by wasim akram