दारुच्या नशेत असताना माणूस काहीही करु शकतो असं म्हटलं जातं. याच वाक्याची प्रचिती केरळमधील कोलार येथील नागरिकांना आली. येथील एका व्यक्तीने गाडीसमोर आलेल्या विषारी सापाचा चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. यासंदर्भातील वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.

कोलार येथील एक व्यक्ती दारुच्या नशेत बाईकवरुन जात असताना रस्त्यावर साप आडवा आला. या व्यक्तीने गाडीवर बसल्या बसल्याच खाली वाकून साप हातात घेतला आणि कडकडून त्याचा चावा घेतला. गावातील लोकांसमोर हा सर्व प्रकार घडला. “तू माझा रस्ता अडवण्याची हिंमत कशी केली,” असं ही व्यक्ती सापाला हातात घेऊन जोरात ओरडत होती. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार या व्यक्तीचे नाव कुमार असल्याची माहिती समोर आली आहे. “हा साप विषारी असल्याचे मला ठाऊक नव्हते. मात्र सापाचा चावा घेतल्याने मला काहीही होणार नाही याची खात्री होती,” असं कुमारने या घटनेबद्दल बोलताना सांगितलं. हा धक्कादायक प्रकार पाहून काहींनी पोलिसांना याबद्दल माहिती दिल्याचे समजते. या सापाचे तुकडे तुकडे करुन फेकल्यानंतरच कुमार बाईकवरुन घटनास्थळावरुन निघून गेला.

लॉकडाउन दुसऱ्यांदा वाढवण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी दारुविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळेच मद्याच्या धुंदीत अपघात झाल्याचे वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या एका वृत्तानुसार बेंगळुरुमधील एक व्यक्तीचा दारुच्या नशेत अपघाती मृत्यू झाला. ही व्यक्ती दारुच्या नशेत नाल्यात पडल्याने डोक्याला मार लागून जखम झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समजते.