शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वीच कुणालच्या ‘शट अप या कुणाल’ चा राऊत विषेश भाग प्रकाशित झाला. या पॉडकास्टमध्ये राऊतांनी दिलखुलासपणे राजकीय प्रश्नांना उत्तरे दिल्याचं पहायला मिळालं. मुलाखतीबरोबरच या कार्यक्रमाशीसंबंधित इतर अनेक गोष्टींची चर्चाही झाली. या पॉडकास्टमध्ये कुणालने राऊतांना जेसीबी भेट दिल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबरच हा कार्यक्रम प्रदर्शित झाल्यानंतर आता कुणालने अभिनेत्री कंगना रणौतकडे एक मागणी केली आहे.

कुणालने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने, “कंगना मॅढम तुमचीही स्वाक्षरी मिळू शकते का?” असा प्रश्न कंगनाला टॅग करुन विचारला आहे. कुणालने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दैनिक सामनामधील एका बातमीचे कात्रण फ्रेम केल्याचे दिसत आहे. कंगनाच्या घराच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईदरम्यानचा जेसीबीने बांधकाम पाडत असल्याचा फोटो आणि त्यावर ‘उखाड दिया’ अशा मथळ्याखाली दिलेल्या बातमीचे हे कात्रण आहे. या फ्रेमवर खासदार संजय राऊत यांची स्वाक्षरी दिसत आहे. फ्रेमवर राऊतांनी स्वाक्षरी केल्याने यावर कंगनानेही स्वाक्षरी द्यावी अशी खोचक मागणी कुणालने ट्विटवरुन केली आहे.

कुणाल कामराच्या या पॉडकास्टमध्ये राऊतांनी कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई आम्ही केली नसून ती मुंबई महानगरपालिकेने केल्याचे सांगितले. तसेच फ्रेममध्ये दिसणाऱ्या बातमीच्या मथळ्यासंदर्भात प्रश्न विचारला असता राऊत यांनी, कंगनाने मुंबई येण्याआधी ज्या शब्दांमध्ये आवाहन दिलं होतं त्याच शब्दांमध्ये तो मथळा छापण्यात आला होता. तिने केलेल्या मागणीचा आम्ही आदर केला असं उत्तर दिलं होतं.

कुणाल कामराच्या या पॉडकास्टचा टीझर प्रसिद्ध झाला होता त्यावेळी त्यामध्ये कुणाल राऊतांना खेळण्यातील जेसीबी भेट देताना दिसला होता. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना कंगनाने, “भलेही मला प्रचंड मोठा मानसिक त्रास देण्यात आला. भावनिक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या माझं खच्चीकरण करण्यात आलं. पण यातून महाराष्ट्र सरकार आणि त्याची अकार्यक्षमता व राजकीय डावपेच दिसून आला. त्यांच्या भोळेपणावरील पडदा दूर होताना दिसतोय. माझ्या घरावरील अवैध बांधकाम म्हणत केलेल्या कारवाईची अशी चेष्टा? यावरुनच सगळं स्पष्ट होतंय”, असं म्हटलं होतं.