रात्री मोबाइल चार्जिंगला लावून झोपलेल्या युवकाला झोपेतच मृत्यूने गाठल्याची धक्कादायक घटना ओदिशामध्ये घडली आहे. रात्रीतून मोबाइलचा स्फोट झाल्याने 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू झालाय.

चार्जिंगला लावलेल्या मोबाइलवर काही काम करत नसतानाही किंवा त्याचा वापर करत नसतानाही स्फोट झाला हे विशेष. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओदिशाच्या जगतसिंहपूर जिल्ह्यातील पारादीप-अठरबांकी परिसरात ही घटना घडली आहे. कुना प्रधान असं मृत युवकाचं नाव आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जगन्नाथ ट्रक ओनर्स असोसिएशनच्या कार्यालय परिसरात एका मंदिराचं बांधकाम सुरू होतं. तेथे हा युवक गवंडी काम करायचा. रविवारी रात्री आपल्या रुममध्ये तो मोबाइल चार्जिंगला लावून झोपला होता. चार्जिंगला लावलेला मोबाइल झोपताना त्याने जवळच ठेवला होता. रुममध्ये त्याचे अन्य तीन सहकारी देखील झोपले होते. चौघंही गाढ झोपेत असताना चार्जिंगला लावलेल्या मोबाइलचा स्फोट झाला आणि जागेवरच युवकाचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. स्फोट नेमका किती वाजता झाला याची माहिती नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सकाळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जगतसिंहपूर येथील पोलिसांनी दिली आहे. परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होतेय.