अनेक कर्मचारी ऑफिसच्या वेळा पाळत नाही, दिलेल्या वेळेपेक्षा नेहमीच ऑफिसला उशीरा पोहोचतात अशा तक्रारी काही नवीन नाही. ऑफिसला कितीही वेळेत पोहोचायचा प्रयत्न केला तरी उशीर हा होतोच. पण कोणत्याही कारणामुळे ऑफिसमध्ये पोहोचायला आपल्याला उशीर होऊ नये यासाठी अमेरिकेतील एक कर्मचारी चक्क रात्रभर चालत कामाच्या ठिकाणी पोहोचला.

या कर्मचाऱ्याचं नाव वॉल्टर कर्र. वॉल्टर विद्यार्थी आहे. शिकत असताना तो फावल्या वेळात कंपनीत काम करतो. त्याच्या कामाचा पहिलाच दिवस असल्यानं त्याला सकाळी लवकर वेळेत कामावर पोहोचायचं होतं मात्र रस्त्यात त्याची गाडी बंदी पडली. त्यामुळे तो चालतच निघाला. साधरण चार तास त्यानं पायी प्रवास केला. पहाटे तीनच्या सुमारास गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या नजरेस वॉल्टर पडला. पोलिसांनी त्याला हटकलं. मात्र जेव्हा पोलिसांना वॉल्टरचा कामाप्रतीचा प्रामाणिकपणा कळला तेव्हा पोलिसांनी स्वत: त्याला मदत देऊ केली. बरंच अंतर पायी कापल्यानं पोलिसांनी दमलेल्या वॉल्टरला खायला दिलं तसेच पुढे कामाच्या ठिकाणी त्यांनी वॉल्टरला सोडलं.

एका जोडप्याला शिफ्टींगसाठी मदत करण्याची जबाबदारी वॉल्टरवर होती. त्यासाठी सकाळी त्याला वेळेत पोहोचणं गरजेचं होतं. गाडी बंद पडल्याचं कारण सांगून उशीर केला असता किंवा घरी थांबलो असतो तर कंपनीचं नाव खराब झालं असतं म्हणूनच मी चालत जाण्याचा निर्णय घेतला असं वॉल्टर म्हणाला. वॉल्टरचा हा प्रामाणीकपणा कंपनींच्या सीईओंनादेखील इतका भावला की त्यांनी वॉल्टरचं कौतुक करत त्याला गाडी भेट म्हणून दिली.