भारतामध्ये ऑनलाइन बाजारपेठ वेगाने वाढत आहे. त्यातच करोनासारख्या संकटामुळे ऑनलाइन बाजारपेठांना अजून चालना मिळाली आहे. मात्र याच संकटामुळे वेगवेगळ्या गोष्टी ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून विकत घेण्याबरोबरच वेगवेगळ्या गोष्टी ऑनलाइन माध्यमांवर विक्री करणाऱ्यांमध्येही वाढ झालीय. या साऱ्यामधून गोंधळ प्रचंड वाढलाय हे ही खरंच आहे. असाच एक प्रकार नुकताच समोर आलाय.

ग्रामीण भागामध्ये गुरांचं शेणं आणि गवतापासून बनवल्या जाणाऱ्या शेणाच्या गोवऱ्याही अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. ग्रामीण भागामध्ये इंधन म्हणून जाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या गोवऱ्या अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बरं या गोवऱ्या धार्मिक कार्यासाठी वापराव्यात असंही अ‍ॅमेझॉनच्या साईटवर लिहिलेलं आहे. मात्र असं असलं तरी एका व्यक्तीने चक्क या गोवऱ्या बिस्कीटं म्हणून खाल्ल्या आणि त्याचा रिव्ह्यूही लिहिला आहे. भकवास चव आहे अशा मथळ्याखाली एका व्यक्तीने हा रिव्ह्यू लिहिला आहे. अ‍ॅमेझॉनच्या साईटवर प्रोडक्टच्या खाली हा प्रोडक्ट कसा वाटला हे मत नोंदवण्यासाठी देण्यात आलेल्या रिव्ह्यू सेक्शनमधील या ग्राहकाची कमेंट सध्या सोशल नेटवर्किंगवर धुमाकूळ घालत आहे.

व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉर्टमध्ये हा ग्राहक शेणाच्या गोवऱ्या विकणाऱ्या कंपनीवर नाराज असल्याचे दिसत आहे. त्याने या प्रोडक्टला सर्वात कमी म्हणजे एक स्टार दिला आहे. या गोवऱ्यांची चव मातीसारखी लागत होती असं या ग्राहकाने म्हटलं असून या ‘बिस्कीटांना’ अजून कुरकुरीतपणा येण्यासाठी काहीतरी करावं, असा सल्लाही या महाशयांनी कंपनीला दिला आहे. “मी जेव्हा हे खाल्लं तेव्हा त्याची चव खूपच वाईट लागली. गवत आणि माती खाल्ल्यासारखी चव आहे याची. मला त्यानंतर जुलाबाचा त्रास झाला. अशा गोष्टी बनवताना स्वच्छतेची जरा जास्त काळजी घ्या. त्याचप्रमाणे हा प्रोडक्ट अजून कुरकुरीत कसा होईल याकडेही लक्ष द्या,” असं या रिव्ह्यूमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या शेणाऱ्या गोवऱ्या बिस्कीटासारख्या आकाराच्या असल्याने त्या बिस्कीट म्हणून खाल्ल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केलीय.

विशेष म्हणजे अ‍ॅमेझॉनच्या प्रोडक्ट डिस्क्रीप्शनमध्ये ही वस्तू खास करुन धार्मिक कार्यामध्ये वापरण्यासाठी असल्याचे नमूद करण्यात आलं आहे. ती खाण्यासाठी वापरावी असं कुठेही लिहिण्यात आलेलं नाही. “१०० टक्के खऱ्या शेणाच्या गोवऱ्या ज्या रोज हवन, पुजा आणि इतर धार्मिक कार्यासाठी वापरता येतील. भारतीय गायींच्या शेणापासून या बनवल्या आहेत. या पूर्णपणे हाताने बनवलेल्या आहेत. योग्य पद्धतीने त्या वाळवण्यात आल्या असून त्यांच्यामध्ये ओलावा नसल्याने त्या अगदी योग्यपणे जळतात. यांचा वापर किटक पळवून लावण्यासाठी केला जाऊ शकतो. ५ इंच व्यास असणाऱ्या या गोवऱ्या हातळ्यासाठी अगदी योग्य आकाराच्या आहेत. या दिर्घकाळ टीकू शकतात,” असं या प्रोडक्टचं डिस्क्रीप्शन देण्यात आल्यानंतरही कोणत्यातरी महाभागाने या खाऊन पाहिल्याचं स्पष्ट होतं आहे.