चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी ‘वनप्लस’ने आपल्या शानदार स्मार्टफोन्सच्या बळावर जगभरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चिननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्मार्टफोनची बाजारपेठ आहे. हेच कारण आहे ज्यामुळे मोठमोठ्या कंपन्या भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. अॅपलपासून सॅमसंगपर्यंतच्या जवळपास सर्व कंपन्या भारतीयांना आकर्षित करण्यासाठी एकमेकांची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडत नाहीत आणि सोशल मीडियावर तर एकमेकांना ट्रोल करण्यासाठी या कंपन्या अक्षरश: टपूनच बसलेल्या असतात.

सोशल मीडियातील या भांडणामध्ये आता Oneplus नेही उडी घेतली आहे. वनप्लसने अॅपलच्या व्हर्च्युअल असिस्टंट Siri ला ‘भारताचा नंबर 1 प्रीमियम स्मार्टफोन कोणता’ असा प्रश्न विचारुन ट्रोल केलं आहे. या ट्विटमध्ये थेट अॅपलचा उल्लेख करण्यात आलेला नाही, पण ट्विटसोबत एक फोटो शेअर करुन त्यावर, हे Siri…भारतातील नंबर 1 प्रीमियम स्मार्टफोन कोणता असा प्रश्न विचारण्यात आला आहे….आणि ‘हे माझं तुला आव्हान आहे’ असा मजकूरही ट्विट करण्यात आला. वनप्लसच्या या प्रश्नामुळे अॅपलची मात्र विकेट पडल्याचं दिसतंय. कारण, ‘सिरी’ला जेव्हा हा प्रश्न खरोखर विचारला जातो त्यावेळी ‘सिरी’कडून वनप्लसचं उत्तर मिळतं आणि त्याच्याशी निगडीत रिझल्ट समोर दाखवले जातात. याचाच फायदा वनप्लसला झालाय आणि कंपनीने अॅपलला ट्रोल केलं. या ट्विटनंतर वनप्लसने अजून एक ट्विट करत ‘आमच्या स्मार्टफोनमध्ये सिरीसारखं फीचर नाहीये…गुगल असिस्टंट वापरा’ असं म्हणत निशाणा साधला आहे.

काही दिवसांपूर्वीच Counterpoint ने भारतात स्मार्टफोन मार्केटशी निगडीत एक अहवाल जारी केला होता. यामध्ये वनप्लस भारतातील नंबर एक प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड असल्याचं सांगण्यात आलं आहे.