टिक-टॉक व्हिडीओमुळे पोलीस दलातून निलंबित झालेली महिला पोलीस कर्मचारी आता गुजराती व्हिडीओ अल्बममधील मोठी स्टार बनली आहे. अल्पिता चौधरी असे या महिला पोलिसाचे कर्मचाऱ्याचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी रविवारी अल्पिताचा ‘कच्ची कैरी, पकी कैरी’ हा नवा अल्बम बाजारात आला. अल्पिताने पोलीस ठाण्यातील तिच्या डान्सचा व्हिडीओ टिक टॉकवर पोस्ट केला होता. त्यामुळे तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

मेहसाणा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात त्यावेळी तिची ड्युटी होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. पोलीस दलातून निलंबित झाल्यानंतर तिने, स्वत:च्या मर्जीने आयुष्य जगायचे ठरवले. तिने तिचे गायन, नृत्य बंद केले नाही. गुजराती गायक जिग्नेश कविराज सोबतचा तिचा ‘टिक टॉक नी दिवानी’ हा पहिला व्हिडीओ सप्टेंबरमध्ये रिलीज झाला. त्यानंतर तिने दोन धार्मिक व्हिडीओ अल्बमसाठी गायन केले.

‘मला अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याच्या ऑफर येत आहेत, पण वरिष्ठांची परवानगी मिळणे आवश्यक आहे’ असे अल्पिताने सांगितले. अल्पिता २०१६ साली पोलीस दलात रुजू झाली. आत ती तिचे काम संभाळून गायन, नृत्याची आवडही जपते. “अभिनेत्री, मॉडेल, गायिका होणे हे माझे बालपणापासूनचे स्वप्न होते. पण माझे वडिल पोलीस दलात होते. त्यांना मला पोलीस झालेले पाहायचे होते. मी त्यांची इच्छा पूर्ण केली व पोलीस दलात रुजू झाले. दुसऱ्या स्वप्नासाठी पहिल्यावर पाणी सोडणे मला योग्य वाटत नाही” असे अल्पिता चौधरीने सांगितले. आतापर्यंत तिने चार व्हिडीओ अल्बममध्ये काम केले आहे. सध्या ती मेहसानाच्या कादी पोलीस ठाण्यात ड्युटीवर आहे.