इटलीमध्ये करोनाने थैमान घातलं आहे. इटलीमध्ये आतापर्यंत २७ हजार ९८० जणांना करोनाची लागण झाली आहे. इटलीमध्ये करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या दोन हजारहून अधिक आहे. तर या रोगातून पूर्णपणे बरे झालेल्याची संख्या दोन हजार ७०० हून अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर इटलीमधील सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या असून संपूर्ण शहरे लॉक डाऊन करण्यात आली आहेत. अनेकांनी स्वत:च घराच्या बाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याने शहरांमधील रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसत आहे. मात्र अशातही एक सकारात्मक बातमी समोर येत आहे.

इटलीमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळ असणाऱ्या व्हेनिस शहरही लॉक डाऊनमुळे पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे रस्त्यांबरोबर या शहरामधील जगप्रसिद्ध कालव्यांमधून होणारी वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. या कालव्यांमध्ये अनेक बोटी झाकून ठेवण्यात आल्या असून येथे संचारबंदीसारखी परिस्थिती आहे. कालव्यांमधून होणारी पर्यटकांची वाहतूक आणि बोटींची ये-जा बंद झाल्याने कालव्यांमधील पाणी अधिक स्वच्छ झालं आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार या कालव्यांमधील पाण्याचा दर्जा अनेक पटींनी सुधारला आहे. तसेच शहरामधील हवेचा स्तरही चांगलाच सुधारल्याने सीएनएनने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

“कालव्यांमध्ये होणारी वाहतूक जवळजवळ पूर्णपणे बंद झाल्याने कालव्यांमधील पाणी स्वच्छ दिसत आहे. कालव्यामधील गाळ तळाचा बसल्याने पाणी स्वच्छ दिसत आहे. बोटींच्या वाहतूकीमुळे कालव्यांमधील गाळ पाण्यात मिसळ्याने त्याचा स्तर खालावतो,” असं व्हेनिसच्या महापौराच्या अधिकृत प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

हे पाणी इतकं स्वच्छ झालं आहे की या पाण्यामध्ये मासेही सहजपणे दिसू लागले आहेत. इतकच नाही तर कालव्यांमध्ये हंस आणि डॉल्फिन मासेही दिसून येत आहेत. अनेकांनी या कालव्यांमध्ये पोहणारे हंसाचे कळप आणि डॉल्फिन्सचे फोटो सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केले आहेत.

उपग्रहांच्या सहाय्याने काढण्यात आलेल्या फोटोंमध्येही इटलीमधील प्रदूषण कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. युरोपीयन स्पेस एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार इटलीमधून होणारे नायट्रोजन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी झाले आहे. यासंदर्भातील वृत्त मेल वनने दिले आहे.

एकीकडे करोनामुळे अनेक धक्कादायक बातम्या समोर येत असताना दुसरीकडे या अशा बातम्यांमुळे काहीसे दिलासादायक चित्र दिसत आहे. या बातम्यांमुळे मानव पर्यावरणाला किती हानी पोहचवत आहे याचा अंदाज येत असल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.