जगप्रसिद्ध टाइम मॅगझीनने वर्ष 2020 च्या अखेरच्या महिन्यासाठी अर्थात डिसेंबर 2020 चं कव्हर पेज जारी केलं आहे. पण, यावेळी मॅगझीनच्या कव्हर पेजवर 2020 वर ‘रेड क्रॉस’ (X) मारण्यात आला आहे. टाइम मॅगझीनच्या इतिहासात असं पाचव्यांदा झालंय. यापूर्वी चार वेळेस या प्रसिद्ध मॅगझीनने आपल्या कव्हर पेजवर ‘रेड क्रॉस’ मारला होता.

Time Magazine ने पहिल्यांदा 1945 मध्ये जर्मनीचा हुकूमशाह अ‍ॅडॉल्फ हिटलर (Adolf Hitler) यांचा मृत्यू दर्शवण्यासाठी रेड क्रॉसचा वापर करण्यात आला होता. दुसऱ्यांदा 2003 मध्ये इराक युद्धाच्या सुरूवातीला टाइम मॅगझीनने कव्हर पेजवर रेड क्रॉस मारला होता. त्यानंतर वर्ष 2006 मध्ये अमेरिकी सैन्याने इराकमध्ये अल-कायदा नेता अबू मौसब अल-जरकावीचा खात्मा केल्यानंतर मॅगझीनने तिसऱ्यांदा रेड क्रॉसचा वापर केला.

नंतर 2011 मध्ये दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर टाइम मॅगझीनने चौथ्यांदा रेड क्रॉसचा वापर केला होता, आणि आता पाचव्यांदा 2020 च्या अखेरीस मॅगझीनने पुन्हा रेड क्रॉस वापरलाय. करोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर यावेळी रेड क्रॉस मारण्यात आला आहे. याशिवाय, कव्हर पेजवर ‘The Worst Year Ever’ म्हणजे आतापर्यंतचं सर्वात वाईट वर्ष असंही नमूद केलं आहे.