विश्वचषकाच्या साखळी सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने दिलेल्या 353 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 316 धावांवर संपुष्टात आला. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी तीन फलंदाजांना तंबूत धाडलं. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 69 धावा केल्या, आणि भारताने विश्वचषक इतिहासातला ऑस्ट्रेलियावरचा चौथा विजय दणक्यात साजरा केला. या विजयानंतर सोशल मीडियात भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव करणारे ट्विट्स आणि पोस्ट व्हायरल होत आहेत. पण एका ट्विटने सर्वांनाच बुचकाळ्यात टाकलं आहे, आणि हे ट्विट आहे भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचं.


‘त्याच्या अर्थहीन फलंदाजीप्रमाणेच ट्विटरवरील त्याचे कमेंट आहे…नकारात्मक मार्गाने केवळ लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे’. अशा आशयाचं ट्विट गांगुलीने भारताने कांगारुंवर विजय मिळवताच केलं. या ट्विटमध्ये गांगुलीने कोणाचंही नाव लिहिलेलं नाही किंवा कोणाला टॅग देखील केलेलं नाहीये. एकीकडे सर्व आजी-माजी खेळाडू भारतीय संघासाठी अभिनंदनाचे ट्विट करत असताना गांगुलीच्या या ट्विटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं असून, दादाने नेमका कोणावर निशाणा साधलाय याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. अनेक युजर्सच्या मते या ट्विटद्वारे गांगुलीने माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.


भारतीय संघाची फलंदाजी संपल्यानंतर मांजरेकरने, ‘गांगुली समालोचन कक्षात असताना इतरांना बोलण्याची संधी देत नाही’ अशा आशयाचं उपहासात्मक ट्विट केलं होतं.नेटकऱ्यांच्या मते मांजरेकरने भारतीय संघाची फलंदाजी संपताच ट्विट केलं होतं तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी गांगुलीने मॅच संपल्यानंतरची वेळ साधली. त्यामुळे सोशल मीडियात गांगुलीने मांजरेकरलाच लक्ष्य केल्याची चर्चा आहे. दरम्यान, त्या ट्विटमुळे संजय मांजरेकरवर गांगुलीच्या चाहत्यांकडूनही जोरदार टीका होत आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याच्यावर गांगुलीने निशाणा साधला असण्याचीही शक्यता वर्तवली आहे. मॅच संपल्यानंतर गांगुलीने मारलेला हा टोमणा नक्की कोणाला आहे हे अद्याप कळालेलं नसलं तरी या निमित्ताने नेटकऱ्यांना चर्चेसाठी अजून एक विषय नक्की मिळाला आहे.