दक्षिण आफ्रिकेतील क्रूगर राष्ट्रीय उद्यानामधील जंगली म्हैस आणि सिंहांमधील संघर्षाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ अगदी अंगावर काटा आणणार आहे. या व्हिडीओमध्ये तीन सिंह एका म्हशीवर हल्ला करताना दिसत आहेत. ही म्हैस या सिंहापासून वाचण्यासाठी जंगलामध्ये इकडे तिकडे सैरावैरा धावताना दिसत आहे. मात्र सिंहांची या म्हशीचा पाठलाग सोडला नाही. ते म्हशीवर एकामागून एक हल्ला करत होते. अखेर म्हशीने या सिंहांपासून स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी पर्यटकांच्या गाडीलाच धडक दिली.

२७ ऑक्टोबर रोजी क्रूगर राष्ट्रीय उद्यानामध्ये हा सर्व प्रकार घडला. या घटनेचा पर्यटकांनी शूट केलेला व्हिडीओ आता व्हायरल होता आहे. या व्हिडीओमध्ये एक सिंह आणि दोन सिंहीणी एका म्हशीचा पाठलाग करुन तिची शिकार करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हा संघर्ष पाहण्यासाठी पर्यटकांच्या जंगल सफारीच्या गाड्या वाटेतच थांबल्या. व्हिडीओमध्ये म्हैस स्वत:ला वाचवण्यासाठी उंच गवतामधून पळण्यापासून ते सिंहांना थेट धडक देण्यापर्यंत अनेक प्रयत्न करताना दिसते. मात्र सिंह तिचा पिच्छा सोडत नाहीत. एक सिंह म्हशीच्या शेपटीच्या बाजूने तिच्यावर हल्ला करतो. अनेकदा प्रयत्न करुनही हा सिंह आपली पकड सोडत नाही हे समजल्यानंतर ही म्हैस गवतामधून रस्त्याकडे धावत येते आणि रस्त्यावर उभ्या असणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला जोरात धडक देते. या धक्क्याने तिच्या पाठीवरील सिंह खाली पडतो आणि ती पळ काढते. मात्र त्यानंतरही सिंह तिचा पाठलाग करताना व्हिडीओत दिसतात.

हा संपूर्ण प्रकार अगदी जवळू पाहणाऱ्या पर्यटकांमध्ये जेनिफर कॉलमॅन आणि लिचन टोन्कीन या दोघांचा समावेश होता. आधी तीन सिंह विरुद्ध एक म्हैस असं चित्र पाहून म्हैस आता काही वाचत नाही असं वाटलं. मात्र जेव्हा ती धावू लागली आणि तिने सिंहांना पळवून लावण्यासाठी गाडीला जोरदार धडक दिली तेव्हा आम्हालाही काही काळ भीती वाटली. ही धडक एवढ्या जोरात होती की गाडीची बॅक लाइट तुटली असं या दोघांनी सांगितलं. धडकेचा झटका आणि आवाज ऐकून सिंह दूर पळाले आणि नंतर पुन्हा म्हशीचा पाठलाग करु लागले.

क्रूगर राष्ट्रीय उद्यान हे आफ्रीकेतील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे. येथे सिंह, गेंडे, जंगली म्हशी, हत्ती आणि चित्तेत मोठ्या प्रमाणात आढळून येतात.