करोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये लॉकडाउन झाल्याचा जबरदस्त फायदा व्हिडिओ कॉन्फर्सिंग सर्व्हिस अ‍ॅप Zoom ला झाला असून हे अ‍ॅप चांगलंच ‘डिमांड’मध्ये आलंय. ‘वर्क फ्रॉम होम’ करताना ऑनलाइन मीटिंग्ससाठी झूम अ‍ॅपचा वापर प्रचंड वाढलाय.

झूम अॅपच्या सुरक्षिततेबाबत उणीव असल्याची सूचना सरकारकडून देण्यात आल्यानंतरही या अॅपचा वापर करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. गेल्या तीन आठवड्यांत ऑनलाईन मीटिंग अनुप्रयोगाच्या वापरामध्ये 50% वाढ नोंदवण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

21 एप्रिल रोजी झूम वापरणाऱ्यांची संख्या ३०० मिलियनहून अधिक होती. बुधवारी अॅपच्या सुरक्षिततेबाबत माहिती देणाऱ्या एका वेबिनारमध्ये कंपनीकडून याबाबत माहिती देण्यात आली. एक एप्रिल रोजी झूम वापरणाऱ्यांची संख्या २०० मिलियन होती, ती २१ एप्रिल रोजी ३०० मिलियन नोंदवण्यात आली. म्हणजे अवघ्या २० दिवसांमध्ये झूम वापरणाऱ्यांच्या संख्येत १०० मिलियनने वाढली.

करोना व्हायरसच्या संकटाआधी जगभरात झूम वापरणाऱ्यांची संख्या १० मिलियन होती. याबाबत बोलताना, “जगभरातील बर्‍याच उपक्रमांमध्ये, रुग्णालये, शिक्षक आणि ग्राहकांचा विश्वास मिळवल्याचा आमचा आनंद आहे”, अशी प्रतिक्रिया यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक युआन यांनी दिली.