19 Lakh EVM Gone Missing: लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिल रोजी मतदान सुरु झाले. तत्पूर्वी काही वापरकर्ते असा दावा करताना दिसत आहेत की मतदानाच्या निकालांवर प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने १९ लाख इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. षडयंत्राचा भाग म्हणून निवडणुका (ईव्हीएम) ‘गहाळ’ करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात इंडियन न्यू काँग्रेस पार्टी (INCP) ने सुप्रीम कोर्टात यासंदर्भात याचिका दाखल करत १९ लाख ईव्हीएममध्ये छेडछाड करून आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकत असल्याचा आरोप केला होता. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया..
काय आहे दावा?
सोशल मीडिया यूजर ‘Nihal Singh Nigam’ ने व्हायरल पोस्ट शेयर करून लिहले, “१९ लाख ईव्हीएम मशीन चोरी झाल्या होत्या अजूनपर्यंत त्यांचा काही थांगपत्ता नाही.”
वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इतर अनेक वापरकर्त्यांनी देखील याच दाव्यांसह ही पोस्ट शेअर केली होती.
तपास:
या व्हायरल पोस्टमध्ये ईव्हीएम गहाळ करण्यात आले असा दावा करण्यात आला आहे, ही एक संवेदनशील बाब आहे. व्हायरल पोस्टमध्ये केलेल्या दाव्याच्या आधारे, बातम्या शोधत असताना आम्हाला अनेक बातम्या सापडल्या ज्यामध्ये या घटनेचा उल्लेख आहे. १५ मार्च रोजी इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, “२०१६ -१९ दरम्यान निवडणूक आयोगाच्या नाकाखालून १९ लाख ईव्हीएम ‘गहाळ’ झाल्याचा आरोप करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी फेटाळून लावली.”
बातम्यांनुसार, INCP ने आपल्या याचिकेत दावा केला होता की १९ लाख ईव्हीएम ‘गहाळ’ झाले होते, पण सर्वोच्च न्यायालयाने हा दावा “पूर्णपणे निराधार” असल्याचे म्हणून फेटाळून लावला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा उल्लेख इतर अनेक अहवालांमध्येही आहे. २०१९ मध्येही, ‘गहाळ’ ईव्हीएम संदर्भात काही अहवाल आले होते. फ्रंटलाइन आणि टीव्ही ९ भारतवर्ष यांनी यासंबंधीचे वृत्त दिले होते, त्यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देत हे दावे निराधार असल्याचे म्हटले होते.
नंतर हेच स्पष्टीकरण देत फ्रंटलाइनच्या संपादकाने चूक मान्य केली होती. टीव्ही ९ ने सुद्धा हा दावा नंतर मागे घेतला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा या बनावट दाव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
आयोगाने ५ एप्रिल २०१४ रोजी एक स्पष्टीकरण जारी केले आणि १५ लाख ईव्हीएम ‘गहाळ’ असल्याचा दावा खोटा ठरवला. ईव्हीएम गहाळ होण्याचे असे कोणतेही प्रकरण नसल्याचे आयोगाने म्हटले असून सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी दाखल केलेली याचिकाही फेटाळून लावली आहे.
या प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील FAQ विभागात देखील दिले आहे. व्हायरल दाव्याबाबत आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा या स्पष्टीकरणाचीच पुष्टी केली.
हे ही वाचा<< भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्येच झाली हाणामारी आणि दोष मात्र.. प्रचारयात्रेचा Video पाहून पडाल बुचकळ्यात, खरं काय?
निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार, लोकसभा निवडणूक २०२४, एकूण सात टप्प्यांत होणार असून, १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानाने सुरुवात झाली आहे आज तब्बल १०२ जागांवर मतदान पार पडले आहे.
निष्कर्ष: लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालांवर प्रभाव टाकण्यासाठी मतदान करण्यापूर्वी १९ लाख EVM (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स) ‘गहाळ’ केल्याचा दावा खोटा आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणी दाखल केलेली याचिका पूर्णपणे निराधार ठरवत फेटाळली आहे.
सौजन्य- विश्वास न्यूज
अनुवाद- अंकिता देशकर