गणेशोत्सव म्हटलं की सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. महाराष्ट्रात तर जरा जास्तच उत्साह असतो. मुंबई पुण्यात गणेशोत्सवाचे वातावरण काही वेगळे असते. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यातूनच झाली त्यामुळे दरवर्षी पुण्यात पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. पुण्यातील मानाच्या गणपतींसह प्रसिद्ध गणपती आगमन अत्यंत थाटात होते. पाना-फुलांनी रथ सजवले जातात, रस्त्यांवर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात, साहसी नृत्य आणि कला सादर केले जाते, वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात उत्साहात सर्व मंडाळाच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. हा सोहळा डोळ्यांनी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पुणेकर मध्यवर्ती पेठेत हजेरी लावतात. पण हा सोहळा इथेच संपत नाही ही तर सुरुवात असते. मानाचे गणपती आणि पुणेकरांचा लाडका बाप्पा दगडूशेठच्या दर्शनासाठी रोज पुणेकरांची गर्दी होते. गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील गणेशोत्सवाची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे त्यामुळे बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, शनीवारी मध्यरात्री दगडूशेठ गणपती मंदिरासमोर भाविकांची प्रंचड गर्दी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुण्यात जितके महत्त्व मानाच्या गणपतींना आहे तितकेच महत्त्व श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट बाप्पालाही आहे. भाविकांच्या मनातील इच्छा पूर्ण करणाऱ्या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय पुणेकरांचे गणेशोत्सव पूर्ण होत होत नाही. दरम्यान पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी अभूतपूर्व गर्दी झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी रात्री २ वाजताच्या वेळेचा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये मंदिराच्या परिसरात भक्तांची मोठी गर्दी झाल्याचे दिसत आहे. संपूर्ण रस्ता लोकांनी भरलेला दिसत आहे. भक्तांच्या लांबलचक रांगा लागलेल्या आहेत. या ठिकाणी एवढी गर्दी झाली आहे की पाय ठेवायची जागा उरलेली नाही. एवढ्या गर्दीतही दर्शनासाठी आतुर असलेल्या भक्तांचा उत्साह पाहायला मिळत आहे. भाविकांच्या सहनशीलतेमुळे गर्दी असूनही संपूर्ण वातावरण भक्तिभावपूर्ण आणि उत्साही दिसत आहे. गर्दी पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, भक्तांमध्ये उत्सुकता आणि उत्साह याचे चित्र उभे राहिले आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आलेली ही गर्दी उत्सवाच्या वैभवाचे आणि भक्तांमधील श्रद्धेचे प्रतीक ठरली आहे.