राजस्थानमधील पुष्कर मेळ्यात दरवर्षी देशभरातील शेतकरी, व्यापारी आणि पशुपालक आपली जनावरे घेऊन येतात. मात्र, या वर्षीच्या मेळ्यात एका भल्यामोठ्या म्हशीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील ‘अनमोल’ नावाच्या या म्हशीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिची किंमत तब्बल २३ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. तिचं वजन तब्बल १,५०० किलो असून तिचा दररोजचा खर्चच सुमारे १,५०० रुपयांपर्यंत जातो. या कारणामुळे ‘अनमोल’ आता इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे.
हा व्हिडीओ राजस्थानमधील प्रसिद्ध पुष्कर पशू मेळ्यातील आहे, जिथे हजारो प्राणी विक्रीसाठी आणले जातात. त्यातच ‘अनमोल’ नावाच्या या हरियाणवी म्हशीच्या भव्य प्रवेशाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर वेगाने व्हायरल झाला आहे. व्हिडीओत ‘अनमोल’ मेळ्यात मिरवताना दिसते आणि तिचा अंगभर काळा चमकदार कोट आणि देखणी ठेवण सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
व्हिडीओमध्ये ‘अनमोल’ तिच्या मालकाबरोबर मेळ्यात प्रवेश करताना दिसते. तिच्या अंगावर प्रकाश पडताच तिच्या चमकदार त्वचेचे तेज अधिक खुलून दिसते. प्रेक्षक तिच्याकडे पहात थांबून मोबाईल काढून फोटो आणि व्हिडीओ शूट करत आहेत. तिची उंची, वजन आणि संतुलित शरीरयष्टी पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. मेळ्यातील सूत्रसंचालकही तिची ओळख करून देताना “ही आहे २३ कोटींची म्हैस – अनमोल!” असे सांगतात.
दररोज ‘अनमोल’ला २५० ग्रॅम बदाम, ४ किलो डाळिंब, ३० केळी, ५ लिटर दूध आणि २० अंडी दिली जातात. त्याचबरोबर तिला तूप, सोयाबीन, मका, तेलकट खाद्यपदार्थ आणि हिरवा चारा दिला जातो. तिच्या मालकाने सांगितले की, अनमोलला रोज दोन वेळा बदाम आणि मोहरीच्या तेलाने मालिश केली जाते, ज्यामुळे तिचा कोट चमकदार आणि त्वचा मऊ राहते.
पाहा व्हिडिओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकल्यानंतर अवघ्या काही तासांत त्याला १.८३ लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले. अनेकांनी प्रतिक्रिया देत म्हटले, “ही म्हैस नाही, लक्झरी लाइफ जगणारी सेलिब्रिटी आहे!”, “इतक्या खर्चात आमचं संपूर्ण कुटुंब चालेल”, “हरियाणाची शान – अनमोल!”, तर काहींनी विनोदी पद्धतीने लिहिलं, “ही म्हैस नव्हे, Bollywood ची स्टार दिसतेय!”
‘अनमोल’च्या चर्चेबरोबरच मेळ्यात ‘युवराज’ नावाची ३५ कोटी रुपयांची म्हैसही दाखल झाली असून तिचं वजन सुमारे ८०० किलो आहे. या वर्षीचा पुष्कर मेळा ३० ऑक्टोबरपासून सुरू झाला असून तो ५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या मेळ्यातील ‘अनमोल’ म्हशीचा व्हिडीओ आणि तिचे राजेशाही जीवनमान हा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे.
