Viral Video भारतात लग्न सोहळे अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरे होतात, हे आपल्याला माहीत आहेच. लग्नातली वरात म्हणजे लग्नाला आलेल्यांसाठी नाचाची पर्वणीच. भारतात आपण अशा अनेक वराती पाहिल्या आहेत. पण भारतीय पद्धतीची लग्नाची वरात तुम्ही न्यूयॉर्कमध्ये निघाल्याचं पाहिलं आहे का? नाही ना. मग हा व्हिडीओ नक्की बघा. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ४०० वराती वॉल स्ट्रीटवर नाचत आहेत. ज्यामुळे इथली वाहतूक ठप्प झाली आहे हे या व्हिडीओत दिसतं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओत काय दिसतं आहे?
सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो न्यूयॉर्कच्या वॉल स्ट्रीटचा आहे. या ठिकाणी ४०० वराती हे भारतीय पारंपरिक पोषाख घालून डीजेच्या तालावर ठेका धरत आहेत. न्यूयॉर्कमधल्या वॉल स्ट्रीट या ठिकाणी असलेल्या गगनचुंबी इमारतींसह वॉल स्ट्रीटवर जमलेली ही प्रचंड गर्दी लक्ष वेधून घेते आहे. हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात अरे मी पण तिथे पाहिजे होतो अशीच भावना आहे.
सलोनी मेहता यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल
इन्स्टाग्रामवर सलोनी मेहता यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या म्हणतात मी या लग्नात सहभागी झाले होते. मी पाहिलं की ४०० वराती रस्त्यावर डिजेच्या तालावर ठेका धरत आहेत हे पाहिल्यावर या वरातीसाठी वॉल स्ट्रीट बंद करण्यात आला. हे फक्त एक लग्न नव्हतं मला वाटतं की मी एका इतिहासाची साक्षीदार ठरले आहे. वॉल स्ट्रीटवर जी वरात निघाली त्यात ४०० जण होते. आम्ही हा रस्ताच बंद केला असं डीजे एजेने म्हटलं आहे. एनडीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
नवरा नवरीही व्हिडीओत नाच करताना दिसत आहेत
या व्हिडीओत नवरा, नवरीही नाच करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही संमिश्र प्रतिक्रिया पाहण्यास मिळत आहेत. एका युजरने म्हटलं आहे की मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी वॉल स्ट्रीटवर ढोलाचा आवाज ऐकेन. आणखी एक युजर म्हणतो हे सगळं बकवास आहे, यावर निर्बंध आणले पाहिजेत. तर तिसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की अनेकदा भारतीय लोक लग्नासाठी आयुष्यभर पैसे साठवतात. जगाला आपली खोटी प्रतिमा दाखवण्यासाठी जास्त व्याजदराने कर्ज काढतात आणि लग्नसोहळे साजरे करतात. हा सगळा खर्च अनाठायी आहे.