PM Modi Letter Viral Photo : मुंबई, पुणे, ठाणे, बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकांचे अधिक तास या ट्रॅफिकमध्ये फसण्यात जातायत. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या ट्रॅफिकचे नियोजन करण्यात प्रशासन कमी पडत असल्याने लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकाही अडकून राहत असल्याने अनेकांना आत्तापर्यंत जीव गमवावा लागला. यात विशेषत: बेंगळुरूमधील वाहतूक समस्या अधिक गंभीर बनली आहे. याबाबतचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होतात. दरम्यान, याच समस्येने वैतागलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून तिने दररोज ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भावना, वेदना व्यक्त केल्या आहेत. तिने पत्रात नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊ….

“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, प्रचंड वाहतूक कोंडी असते”

रविवारी, १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगळुरूमधील नम्मा मेट्रोच्या यलो लाईनचे उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते. या प्रसंगी एका पाच वर्षांच्या मुलीने त्यांना एक छोटेसे हस्तलिखित पत्र पाठवले. या पत्रात तिने तिच्या समस्या अचूक भाषेत मांडल्या आहेत. तिने लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, प्रचंड वाहतूक कोंडी असते, यामुळे आम्हाला शाळा आणि ऑफिसला पोहोचण्यास रोज उशीर होतो. रस्ताही खूप खराब आहे, कृपया मदत करा.

बंगळुरूमधील रोजच्या ट्रॅफिकमुळे लोक हैराण

चिमुकलीचे वडील अभिरुप चॅटर्जी यांनी हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे आणि कॅप्शन लिहिले की, पंतप्रधान बंगळुरूला येत आहेत, माझ्या पाच वर्षांच्या मुलीला वाटले की, वाहतूक कोडींची समस्या मांडण्याची ही योग्य संधी आहे. दरम्यान, हजारो लोकांनी चिमुकलीच्या पत्रावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एका युजरने लिहिले की, आशा आहे की पंतप्रधान तुमच्या मुलीला भेटतील आणि तिची इच्छा पूर्ण करतील. दरम्यान, अनेकांनी बंगळुरूमध्ये रोजच्या ट्रॅफिकमुळे हैराण व्हायला होते असे म्हटले आहे.

एखाद्या चिमुकलीने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२३ मध्येही १३ वर्षांच्या अस्मी सप्रेनेही पंतप्रधानांना पत्र पाठवून वायू प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली होती. अस्मी (जिला दमा आणि धुळीची ॲलर्जी आहे) हिने लिहिले होते की, हा फक्त माझा आवाज नाही तर स्वच्छ हवा श्वास घेण्याचा अधिकार असलेल्या लाखो मुलांचा आवाज आहे