रस्त्यावरुन वाहन चालवताना वाहन चालकाने योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. कारण निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. जगभरात दररोज हजारो रस्ते अपघात होत असतात. या अपघातामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतो. माणसांप्रमाणे मुक्या प्राण्यांनादेखील निष्काळजीपणे वाहन चालकांच्या चुकीमुळे जीव गमवावा लागतो, याबाबतची अनेक उदाहरण आपण पाहिली आहेत. पंरतु सध्या ग्रेटर नोएडामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे येथील एका ड्रायव्हरने मुद्दाम एका कुत्र्याला व्हॅनखाली चिरडलं आहे, ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक कुत्रा रस्ता ओलांडताना दिसत आहे. यावेळी कुत्र्याला समोरुन येणारी व्हॅन दिसते त्यामुळे तो जागीच थांबतो आणि ज्या बाजूने आला तिकडे पुन्हा जाण्याचा प्रयत्न करतो. व्हिडीओत दिसत आहे की, व्हॅन आणि कुत्रा यांच्यामध्ये बरेच अंतर आहे. पण यावेळी ड्रायव्हर मुद्दाम त्याची व्हॅन लेनमधून बाहेर काढतो आणि कुत्र्याच्या अंगावर घालतो. यावेळी कुत्रा व्हॅन आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, दुर्दैवाने तो व्हॅनखाली सापडतो.
हेही वाचा- कमी वेळात जास्त दारु पिणं जीवावर बेतलं; २ लाखांसाठी गमावला जीव, संपूर्ण प्रकरण वाचून थक्कच व्हाल
कुत्र्याला जाणूनबुजून चिरडलं –
ड्रायव्हरने असं कृत्य का केलं याबाबतची काही माहिती समोर आलेली नाही. पण व्हिडीओ पाहिल्यानंतर ड्रायव्हरने मुद्दाम कुत्र्याच्या अंगावर गाडी घातल्याचं व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. तर कुत्र्याला व्हॅनखाली चिरडल्यानंतर ड्रायव्हर आपली व्हॅन घटनास्थळी सोडून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच प्राणीप्रेमी चांगलेच संतापले आहेत. तसेच या घटनेत संपूर्णपणे ड्रायव्हरची चूक असल्याचंही प्राणीप्रेमी म्हणत आहेत. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडिओची दखल घेत दादरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोषी ड्रायव्हरवर आवश्यक कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.