मुंबई लोकल लाखो प्रवाशांची पहिली पसंती आहे. प्रवाशांसाठी स्थानकावर उतरण्यासाठी अनेक पूल बांधण्यात आले आहेत. या रेल्वे स्थानकाच्या पुलावर उभे राहून आपण अनेकदा कोणत्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन पहिली येईल याची वाट बघतो किंवा ऑफिस, कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींची वाट बघत उभे राहतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ पहायला मिळाला आहे. एक अज्ञात व्यक्ती ब्रिजवर वाट बघत बघत तिकिटाची होडी तयार करतो.
व्हायरल व्हिडीओ रेल्वेस्थानकाचा आहे. एका तरुणीने रेल्वेस्थानकाच्या पुलावरील एक अनोखं दृश्य तिच्या फोनमध्ये टिपून घेतले आहे. रेल्वेस्थानकाच्या ब्रिजवर एक गोल आकाराचे साधन लावले आहे आणि त्यावर एक होडी बनवून ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही होडी ट्रेनच्या तिकिटातून तयार केली आहे. तसेच ही होडी तयार करून त्याने पुलावरील त्या साधनांच्या वर अगदीच मजेशीर पद्धतीत ठेवली आहे. अज्ञात व्यक्तीने कशाप्रकारे तिकिटाची होडी तयार केली एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा :
ट्रेनच्या तिकिटापासून तयार केली होडी :
प्रवासादरम्यान तिकीट काढले की, एकतर ते आपण मोबाइल कव्हरच्या मागे किंवा हातात घेऊन फिरतो. कधी कधी तर या तिकिटाची अगदीच बारीक घडी करून ती रेल्वेस्थानकावर इथे-तिथे किंवा कचराकुंडीत फेकून दिली जाते. पण, या अज्ञात व्यक्तीला स्थानकाच्या पुलावर उभं राहून काय सुचले माहीत नाही आणि त्याने या तिकिटाची होडी तयार केली आणि पुलावरील एका साधनावर गमतीशीर उभी करून ठेवली. हे पाहताच एका तरुणीने आपल्या मोबाइलमध्ये याचा व्हिडीओ शूट करून घेतला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @dimplewali या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तरुणीने शेअर करून “रिकाम्या हाताला काम आणि कामाला हात” असे कॅप्शन दिले आहे. तृप्ती खानिवडेकर असे या तरुणीचे नाव असून ती एक कन्टेन्ट क्रिएटर आहे. तसेच या व्हिडीओवर तिने मजकूर लिहिला आहे की, स्टेशनवर उभ्या उभ्या लोक काय काय करू शकतात. तर हा व्हिडीओ पाहून अनेक जण मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.