दिल्लीतील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका महिलेने तिच्या फ्लॅटमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल १६ कुत्र्यांना खोलीत डांबून ठेवल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे ती महिलाही कुत्र्यांबरोबर त्याच खोलीत राहात होती असं सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती एमसीडीच्या अधिकार्यांना मिळताच ते फ्लॅटमध्ये तपासासाठी गेले, मात्र आतील दृश्य पाहून सर्वांना मोठा धक्का बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या GK-I पोलिस स्टेशन अंतर्गत GK-I मध्ये असलेल्या IBHAS सोसायटीच्या बी-ब्लॉकमधील फ्लॅटशी संबंधित माहिती MCD ला मिळाली होती. फ्लॅटमधून येत असलेल्या दुर्गंधीचा लोकांना खूप त्रास होत होता, त्यामुळे त्यांनी याची माहिती MCD ला दिली. शिवाय एमसीडीच्या अधिकार्यांनी महिलेशी बोलून तिला कुत्र्यांना उपचारासाठी सोपवण्याची विनंती केली मात्र तिने तसं करण्यास नकार दिला.
अधिकाऱ्यांनी कायदेशीर मार्गाने केली कारवाई –
महिलेच्या नकारानंतर अधिकाऱ्यांनी कायदेशीर मार्गाने सर्च वॉरंट जारी केलं आणि महिलेच्या घराची झडती घेतली. यावेळी तिच्या प्लॅटमधील दृश्य पाहून ते अधिकारीही थक्क झाले. फ्लॅटमधून खूप दुर्गंधी येत होती. शिवाय सर्वत्र कुत्र्यांची घाण पसरली होती. पायऱ्यांवरतीही कुत्र्याची घाण केली होती. फ्लॅटमधून इतका घाण वास येत होता की, तिथे उभे राहणेही कठीण झाले होते असे लोक सांगत आहेत. शिवाय या कुत्र्यांना योग्य आहार न मिळाल्याने त्यांची प्रकृती ठीक बिघडल्याचं सांगितलं जात आहे.
एमसीडी अधिकाऱ्यांनी या कुत्र्यांची सुटका केली असून महिलेविरुद्ध एफआयआर नोंदवला असून तिच्याविरुद्ध आयपीसी कलम २६९ आणि २९१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेच्या फ्लॅटमध्ये वीजपुरवठा नव्हता. अशा स्थितीत ही महिला १६ कुत्र्यांसह तीन वर्षे कशी राहिली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिवाय या घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.