तुमच्यापैकी अनेकजण स्पॅम कॉल्समुळे त्रस्त झाले असतील यात शंका नाही. कारण प्रत्येकाला कधी ना कधी स्पॅम कॉल्स येतात तर काही लोकांना ते सतत येत असतात. शिवाय स्पॅम कॉल करणाऱ्यांना पुन्हा कॉल करु नका असं सांगितलं तरीही ते कॉल करणं बंद करत नाहीत. जर तुम्हालाही हे स्पॅम कॉल्स बंद करण्यात अपयश येत असेल, तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. हो कारण या व्हिडीओतील महिलेने स्पॅम कॉल करणाऱ्यांना असा धडा शिकवला आहे की ते पुन्हा चुकूनही कॉल करण्याचं धाडस करणार नाहीत.

खरं तर, एक महिला स्पॅम कॉल्सना इतकी कंटाळली होती की, तिने कॉल करणाऱ्याला धडा शिकवण्याचे अनोखं काम केलं आहे, जे पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये, एक महिला किचनमध्ये काही काम करत असल्याचं दिसत आहे. यावेळी तिला एक स्पॅम कॉल येतो, ती लगेच तो कॉल रिसिव्ह करते आणि मग एक स्टीलचं भांडं मोबाईलवर ठेवते आणि ते भांडं चमच्याने इतक्या जोरजोरात वाजवते की समोर फोनवर बोणाऱ्या व्यक्तीच्या कानठळ्या बसल्या असतील यांचा अंदाज लावता येऊ शकतो.

हेही पाहा- रक्षाबंधनला पैसे वाचवण्यासाठी भावाचा अनोखा जुगाड; व्हायरल फोटो पाहून नेटकरी म्हणतायत, “जबरदस्त आयडीया…”

या महिलेने स्पॅम कॉलपासून सूटका करण्यासाठी केलेल्या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ @Nationalist2575 या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “खूप स्पॅम कॉल येत आहेत? एकदा प्रयत्न करा. खरे भारतीय इनोवेशन, मी उद्याच करणार आहे.” तर हा व्हिडीओ अनेकांना आवडल्याचं पाहायला मिळत आहे. कारण आतापर्यंत तो ५ लाख १७ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी तो लाईक केला आहे. तर अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, फोनचा मायक्रोफोनच मरुन जाईल. तर दुसऱ्या एकाने लिहिलं आहे, “जबरदस्त जुगाड आहे.” तर आणखी एकाने स्पॅम कॉल ब्लॉक करण्यासाठीचा हा देशी उपाय असल्याचं म्हटलं आहे.