Africans Tik Toks Mock Unhygienic Indian Food : भारतातल्या विविध राज्यांतील स्ट्रीट फूड्स लोक आवडीने खात असल्याचे पाहायला मिळते. पण, अनेकदा हे स्ट्रीट फूड्स बनवताना स्वच्छतेबाबत कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे दिसते.सोशल मीडियावरही अनेक फूड ब्लॉगर्स स्ट्रीट फूड्सचे व्हिडीओ शेअर करतात. त्यातही काही विक्रेते एखादा पदार्थ बनवताना स्वच्छतेकडे अजिबात लक्ष देत नसल्याचे दिसते; शिवाय त्यात वापरले जाणारे पदार्थही अनेकदा भेसळयुक्त असल्याचे समोर येते. पण, तेच पदार्थ लोक वर्षानुवर्षे आवडीने खात असल्याचे पाहायला मिळते. तसेच जगभरातील सोशल मीडिया युजर्स देखील असे स्ट्रीट फूड्सचे व्हिडीओ आवडीने पाहतात. याचदरम्यान आफ्रिकेतून एक व्हिडीओ समोर आला आहे; पण त्यात भारतीय स्ट्रीट फूड्सची खिल्ली उडवली जात असल्याचे दिसून येत आहे. त्या व्हिडीओमध्ये मुद्दाम पदार्थ बनवताना अस्वच्छता दाखवण्यात आली आहे.
टिकटॉकवर शेअर केलेला हा व्हिडीओ आता इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही वेगाने व्हायरल होत आहे. अनेक भारतीयांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर भारतीय स्ट्रीट फूडची खिल्ली उडवणाऱ्या व्हिडीओ क्रिएटर्सवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एकीकडे आफ्रिकेत अन्नधान्याची मोठी टंचाई आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. तरीही हे लोक अशा प्रकारे अन्नाची नासाडी करीत आहेत, असे म्हणत भारतीय युजर्स या आफ्रिकन व्हिडीओ क्रिएटर्सवर नाराजी व्यक्त करीत आहेत.
या किसळवाण्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपला एक पाय भाजी कापून ठेवलेल्या भांड्यात टाकून बसला आहे. आजूबाजूला खूप घाण आहे. हातमोजे न घालता तो लोकांकडून पैसे घेतो आणि भाजीच्या भांड्यात पाय धुऊन तीच भाजी एका बाउलमध्ये टाकतो. त्यानंतर त्यावर इतर काही पदार्थ टाकतो. अत्यंत किळसवाणा प्रकार म्हणजे तो पिठाचा गोळा करून, तो काखेत घेऊन थापतो आणि तोच पुन्हा बाऊलमध्ये टाकून समोरच्या लोकांना देतो. अशा प्रकारे भारतीय स्ट्रीट फूड्सची खिल्ली उडवणारे अनेक व्हिडीओ आफ्रिकेतून समोर आले आहेत. दरम्यान, या व्हिडीओवर लोक विविध कमेंट्स करीत आहेत.
भारतीयांनी घेतली चांगलीच फिरकी
एका युजरने कमेंट करीत म्हटले, “हा व्हिडीओ शूट करण्यासाठी वाया घालवण्याइतके अन्नही त्यांच्याकडे आहे का?” दुसर्या युजरने लिहिले, “आफ्रिका खंडात नेहमीच अन्नाचा तुटवडा असतो. हे लक्षात घेता, अजूनही मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होत आहे.” तिसरा युजर म्हणाला, “आफ्रिकेत अन्न आहे का?” चौथ्या युजरने लिहिले, “तुला या व्हिडीओमध्ये वाया घालवण्यासाठी इतके अन्न आणि पाणी कसे मिळाले?” अशा प्रकारे भारतीयांनी किळसवाणे व्हिडीओ क्रिएट करणाऱ्याची चांगलीच फिरकी घेतली आहे.