Devendra Fadnavis Duplicate Viral Video: या जगात प्रत्येक माणसाचा चेहरा वेगळा असतो असं आपण कायम ऐकत आलोय. पण, तरीही ‘एकाच चेहऱ्याचे सात जण जगात असतात’ हे वाक्य तुम्हालाही अधूनमधून आठवतं का? त्यामागे शास्त्रीय आधार नसला तरी अनेकदा असे चेहरेपट्टीने हुबेहूब जुळणारे डुप्लिकेट्स समोर येतात आणि मग खरी व्यक्ती कोण आणि डुप्लिकेट कोण, याचा गोंधळच उडतो; अगदी हेच आता पुन्हा घडलंय.
काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर भाजपा आमदार नितेश राणेंचा डुप्लिकेट व्हायरल झाला होता. साधं राहणीमान असलेला तो तरुण म्हणजे दिनेश पवार. मंदिरांमध्ये कपाळावर लावल्या जाणाऱ्या गंधाचे ठसे तयार करण्याचं काम करणारा दिनेश एका क्षणात चर्चेत आला. पण, गंमत इथेच संपली नाही. कारण आता अचानक समोर आलाय देवेंद्र फडणवीस यांचा हुबेहूब डुप्लिकेट!
आणि खरी भन्नाट गोष्ट म्हणजे हे दोन्ही डुप्लिकेट्स अनवधानानं एकत्र आलेत. दोघे शेजारी उभे असलेला व्हिडीओ आता सोशल मीडियावर वणव्याप्रमाणे पसरतोय. पाहणारे थक्क होतायत, कारण एका बाजूला नितेश राणेंच्या चेहऱ्यासारखं हुबेहूब साम्य असलेला दिनेश आणि दुसऱ्या बाजूला अगदी सेम टू सेम देवेंद्र फडणवीसांचा डुप्लिकेट!
हा व्हिडीओ dineshpawar5345 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत तो तब्बल १६ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओ कुठे शूट झाला याची अधिकृत माहिती नसली, तरी तो मुंबईतील असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या डुप्लिकेटचा चेहरा पाहून नेटकरी अक्षरशः गोंधळलेत. कुणी मजेत म्हणतंय, “हा तर फडणवीसांचा हरवलेला जुळा भाऊ दिसतोय”, तर कुणी थेट त्याला “राजकारणात उतरण्याचा सल्ला” देतोय. काहींनी तर अगदी चिमटे काढत, “खऱ्या फडणवीसांपेक्षा हा जरा जास्तच हसतमुख दिसतो” असं कमेंटमध्ये लिहिलंय.
आता प्रश्न पडतो, जर हे डुप्लिकेट्स अचानक तुमच्यासमोर आले तर तुम्ही त्यांना ओळखू शकाल का? की खऱ्याऐवजी डुप्लिकेटलाच ‘सर’ म्हणाल? हा व्हिडीओ जितका मजेशीर तितकाच सस्पेन्सने भरलेला आहे, कारण खरी व्यक्ती कोण आणि हुबेहूब कॉपी कोण, यातच प्रेक्षकांना खरी मजा येतेय.
एक मात्र नक्की, नितेश राणेंनंतर आता देवेंद्र फडणवीसांचा डुप्लिकेट समोर आल्यानं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे आणि पुढे अजून कोणत्या राजकीय नेत्याचा डुप्लिकेट समोर येतो, याचीच आता उत्सुकता आहे.