American Woman Viral Video: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसाचे शुल्क १ लाख डॉलर (८८ लाख रुपये) करून भारतीय नागरिकांच्या अमेरिकन ड्रीमवर पाणी ओतले. अनेक भारतीय नागरिक अमेरिकेत जाऊन स्थायिक होण्याची स्वप्नं पाहत असतात. यासाठी धोकादायक असा डाँकी रुट निवडला जातो. लाखो रुपये खर्चून अमेरिकेत पोहोचल्यावर तिथेही जीवन सुरळीत होईल, याची खात्री नसते. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत अवैधपणे शिरलेल्या स्थलांतरितांना बाहेरचा रस्ता दाखवला. अशावेळी एक अमेरिकन महिला मात्र भारतात येऊन राहत आहे. नुसतीच राहत नाही, तर भारत अमेरिकेच्या तुलनेत खूप स्वस्त आणि मस्त आहे, असेही ती अभिमानाने सांगते.
क्रिस्टन फिशर ही अमेरिकन महिला तिच्या इंस्टाग्रामवर नियमितपणे भारतात राहण्याचे तिचे अनुभव शेअर करत असते. तिला भारतात राहायला का आवडते? हेही ती सांगत असते. एका नव्या व्हिडीओत तिने म्हटलं, “मला अमेरिकेत का राहायचे नाही, याचे कारण आज सांगते. अमेरिकन लोक सामान्यतः जास्त कमावतात. पण भारतापेक्षा अमेरिकेत वस्तूंच्या किमती प्रमाणानुसार खूप जास्त आहेत.”
फिशरने आपल्या पोस्टमध्ये दैनंदिन खर्चाचे गणित मांडले आहे. उदाहरणार्थ, केस कापण्यासाठी अमेरिकत साधारणपणे १५ ते ५० डॉलर लागतात. तर भारतात केवळ १.२० ते २.५० डॉलरमध्ये काम होते. वायफायसाठी अमेरिकेत दरमहा ८० डॉलर खर्च होतात, तर भारतात केवळ ८ डॉलर (७०३ रुपये) लागतात. चित्रपटांची तिकिटे, डॉक्टरांची फी, युटिलिटी बिल आणि अगदी मोबाइल प्लॅनही भारतात स्वस्त आहेत, असे फिशरचे म्हणणे आहे.
फिशर पुढे म्हणते की, खरं सांगायचं तर अमेरिकेपेक्षा भारतात परवडणाऱ्या गोष्टींची अनेक उदाहरणे आहेत. जरी आपण भारतात राहून कमी पैसे कमवत असलो तरी, आपण जे पैसे कमवतो त्यावर चांगल्या पद्धतीने जीवन जगता येऊ शकते.
फिशरच्या या व्हिडीओवर अनेकांनी आपापली मते कमेंटस्वरुपात व्यक्त केली आहेत. अनेकांनी फिशरच्या अनुभवांना सहमती दर्शवली आहे. भारतात खर्च आणि जीवनमान यांच्यात चांगला समतोल साधता येतो. एका युजरने लिहिले, भारतात रेस्टॉरंटमधील जेवण तुलनेने स्वस्त आहे. अमेरिकेशी तुलना केली तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही भारतात स्वस्त आहे. तुम्ही या विषयावर आणखी काही पोस्ट करू शकतात. ज्यात इतर विषय घेता येऊ शकतात.
दुसऱ्या एका युजरने लिहिले की, तुम्ही खूप सकारात्मक विचार करत आहात. नाहीतर अनेक लोक (ज्यात विदेशातून परतलेले भारतीयही आहेत) भारतातील नकारात्मक बाजूच दाखवत असतात.
तिसऱ्या युजरने लिहिले की, आयुष्यातील सर्वात चांगला मार्ग म्हणजे अमेरिकेत कमवा आणि भारतात खर्च करा. म्हणूनच बरेच भारतीय स्थलांतर करत आहेत, कमवत आहेत आणि १० ते १५ वर्षांनी परत भारतात येत आहेत.