देशातील आघाडीचे उद्योगपती व महिंद्रा अॅण्ड महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा एका १३ वर्षांच्या मुलीच्या कामगिरीने भलतेच खूश झाले आहेत. त्या मुलीने प्रसंगावधान राखत १५ महिन्यांच्या बाळाची माकडापासून सुखरूप सुटका केली. तिच्या या धाडसी कामगिरीचे आनंद महिंद्रा यांनी खूप कौतुक करीत तिला चक्क नोकरीची ऑफर दिली आहे. आनंद महिंद्रांनी स्वत: या संदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे; जी आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्या १३ वर्षीय मुलीने आपल्या लहान बहिणीचे ‘ॲलेक्सा’ (Alexa) या डिव्हाइसच्या मदतीने माकडापासून प्राण वाचवले.

नेमकी घटना काय?

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील ही घटना आहे. या ठिकाणी एक १३ वर्षीय मुलगी तिच्या १५ महिन्यांच्या लहान बहिणीसह घरी होती. यावेळी एक माकड त्यांच्या घरात घुसले आणि तिच्या बहिणीच्या दिशेने जाऊ लागले. पण, मुलीने न घाबरता ॲलेक्सा डिव्हाइसच्या मदतीने माकडाला पळवून लावले आणि बहिणीचे प्राण वाचवले. मुलीने प्रसंगावधान राखत ॲलेक्सा डिव्हाइसला कुत्र्याचा आवाज काढण्याची व्हॉइस कमांड दिली. ॲलेक्सा डिव्हाइसमधून कुत्र्याचा आवाज येताच माकड घाबरून पळून गेले. मुलीने दाखविलेल्या या हुशारीचे आता कौतुक होत आहे. मुलीने माकडाच्या हल्ल्यापासून केवळ लहान बहिणीचाच नाही, तर आपलाही जीव वाचवला.

हेही वाचा – एटीएममधून पैसे काढताना तरुणीला ‘ही’ एक चूक पडली भारी! झाले २१ हजारांचे नुकसान

आनंद महिद्रांनी ट्विटमधून दिली नोकरीची ऑफर

आनंद महिंद्रांनी एक्सवर एक पोस्ट करीत मुलीच्या धाडसाचे आणि हुशारीचे तोंडभरून कौतुक केले आहे. सध्याच्या युगात माणूस तंत्रज्ञानाचा गुलाम होणार की मालक हा प्रमुख प्रश्न आहे. तरुणीच्या या प्रसंगातून एक दिलासाजनक गोष्ट दिसली आणि ती म्हणजे तंत्रज्ञान नेहमीच मानवी कल्पकतेला सक्षम बनवते. तिचे प्रसंगावधान असाधारण आहे. या मुलीत नेतृत्व करण्याची क्षमता आहे. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जर तिने कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला, तर तर मला आशा आहे की, आम्ही तिला महिंद्रा राईजमध्ये सामील करून घेऊ.