scorecardresearch

पी व्ही सिंधूला ‘थार’ भेट देण्याची युजरची मागणी; आनंद महिंद्रा म्हणाले, “तिच्या गॅरेजमध्ये….”

सिंधूला तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी महिंद्रा थार भेट देण्यात यावी, अशी इच्छा एका चाहत्यानं व्यक्त केली.

PV Sindhu Anand Mahindra
पी व्ही सिंधूला 'थार' भेट देण्याची युजरची मागणी

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने रविवारी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकत इतिहास रचला. कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५  असा पराभव केला. सिंधू ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. सिंधूच्या या कामगिरीनंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राजकारणी, सेलिब्रिटींसह चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचं अभिनंदन केलं. यावेळी सिंधूला तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी महिंद्रा थार भेट देण्यात यावी, अशी इच्छा एका चाहत्यानं व्यक्त केली. त्याला महिंद्रा ग्रूपचे सर्वेसर्वा आंनद महिंद्रा यांनी उत्तर दिलं.

“सिंधूच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला महिंद्रा थार भेट द्यायला पाहिजे,” असं म्हणत या नेटकऱ्याने आनंद महिंद्रा आणि पीव्ही सिंधू यांना ट्विटमध्ये टॅग केले होते. त्याला उत्तर देत आनंद महिंद्रा यांनी एक फोटो ट्विट केला आणि लिहिलं की “सिंधूच्या गॅरेजमध्ये एक थार आधीच पार्क केलेली आहे.” महिंद्रा यांनी शेअऱ केलेला फोटो हा २०१६ मधील असून त्यामध्ये पीव्ही सिंधू आणि साक्षी मलिक दोघी दिसत आहेत.

रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये पीव्ही सिंधूने रौप्य पदक तर, कुस्तीपटू साक्षी मलिकने कांस्यपदक जिंकलं होतं. त्यानंतर, तरुण खेळाडूंना नवीन एसयूव्ही भेट देणार, अशी घोषणा आनंद महिंद्रा यांनी केली होती. पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक स्पर्धा खेळून मायदेशी परतल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी दोघींनाही गाड्या भेट दिल्या होत्या.

दरम्यान, सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर आनंद महिद्रांनी ट्विट करून तिचं कौतुक केलं. “जर मानसिक ताकदीसाठी एखादं ऑलिम्पिक असतं तर सिंधू तिथं सर्वोच्च स्थानी असती. एका पराभवानंतर कांस्य पदकासाठी सामना खेळण्यासाठी किती लवचिकता आणि मानसिक तयारी लागत असेल, याचा विचार करा. पी. व्ही. सिंधू तू आमची गोल्डन गर्ल आहेस.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-08-2021 at 12:19 IST