रस्त्यावर होणाऱ्या भयावह अपघातांपासून बेकायदेशीरपणे रस्त्याच्या मधोमध नाचणाऱ्यांपर्यंत अनेक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होतात जे पाहून धक्का बसतो. अनेकदा लोक मद्यपान करून भररस्त्यात तमाशा करतात तर शुल्लक कारणावरून भांडण करतात. हे लोक वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करतात. आता अशाच एका व्हिडीओची चर्चा होत आहे ज्यामध्ये एक माणूस भर रस्त्यात स्कुटरवर झोपला आहे. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात.
व्हिडीओमधील माणूस झोपला होता की दारूच्या नशेत होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु आता व्हायरल झालेल्या दृश्यांमध्ये तो त्याच्या दुचाकीच्या फूटबोर्डवर बसून झोप घेत असल्याचे दिसून आले आहे. त्याने रस्त्याच्या मधोमध त्याचे वाहन पार्क केले, त्याचे चप्पल फेकून दिले आणि आजूबाजूच्या परिस्थितीची काळजी न करता झोपी गेला.
वर्दळीच्या रस्त्याच्या मधोमध झोपलेला एक माणूस
ही घटना दिवसाढवळ्या घडली आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील श्रीनगर कॉलनीतून ही घटना घडली. व्हिडिओमध्ये दिसते की, चौकड्यांचा शर्ट घातलेला माणूस रस्त्यावर पडलेल्या त्याच्या स्कूटरला पाठ टेकवून झोपलेला होता. त्याचे बूट थोड्या अंतरावर विखुरलेले दिसत होते, ज्यामुळे तो अचानक कोसळल्याचे किंवा थकल्यासारखे वाटत आहे. त्याच्या शेजारी एक मिनी ट्रक, काही बाईक आणि अनेक ऑटोरिक्षा गेल्या, पण त्याला वाहनांची कसली चिंताच नाही.
गर्दीच्या रस्त्यावर झोपलेल्या माणसाचा व्हिडिओ स्थानिक वृत्तसंस्था तेलुगू स्क्राइबने शेअर केला आहे. संबंधित माणसाबद्दल आणि त्याला स्कूटरवर झोप का आली याबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही. व्हिडिओ पाहून अनेकांनी तो मद्यपान करून असे वागत असल्याचा अंदाज बांधला. सार्वजनिक ठिकाणी असे वागून लोक आपला आणि इतरांचा जीव धोक्यात टाकतात.