सोशल मीडियावर सध्या हरियाणातील झज्जर येथील एका कुटुंबाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. त्यांची चर्चा होण्याचं कारण देखील खास आहे. कारण या कुटुंबाने वीज कनेक्शन मिळालं नाही म्हणून त्यांनी घरीच वीजनिर्मिती केली आहे, ज्यामुळे त्यांचे अनेकजण कौतुक करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार येथील एका शेतकऱ्याला वीज कनेक्शन मिळाले नाही म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी थेट कोंबडीच्या विष्ठेपासून वीजनिर्मिती केली. आता हे कुटुंब ही वीज स्वतःच वापरत आहेच शिवाय ती इतरांना विकून पैसेही मिळवत आहेत. या विजेमुळे त्यांच्या घरातील आणि हॅचरीमधील सर्व कामे होत आहेत. शिवाय ते आता कोंबडीच्या विष्ठेपासून सुमारे ५० किलोवॅट वीज निर्मिती करत आहेत. चिकन फार्मवरच अशी उपकरणे बसवण्यात आली आहेत, जी २४ तास वीजनिर्मिती करतात. शिवाय ती उपकरणं दुर्गंधी आणि घाण देखील दूर करतात.

झज्जरमधील सिलानी केशो गावात राहणारे शेतकरीशेतकरी रामेहर यांनी वीज जोडणीसाठी वीज महामंडळाकडे अनेक हेलपाटे मारले. मात्र त्यांना वीज कनेक्शन मिळू शकलं नाही. त्यामुळे त्रासलेल्या रामेहर यांनी स्वत:च घरी वीजनिर्मिती करण्याचं ठरवलं, यासाठी त्यांनी कृषी विभागाच्या मदतीने २० हजार कोंबड्यांची हॅचरी घरी बसवली. रामेहरने सुरुवातीला कोंबडीच्या विष्ठेपासून गॅस बनवला आणि त्याच्या घरच्या गरजा भागवल्या. मात्र, आता त्याने कोंबडीच्या विष्ठेपासून असं काही केलं आहे की, त्याचा आविष्कार पाहण्यासाठी देश-विदेशातील लोक येत आहेत.

हेही पाहा- दारूच्या नशेत महिलेचे पोलिसांशी गैरवर्तन, शिवीगाळ आणि झटापट करतानाचा व्हिडीओ व्हायरल

आधी गॅस नंतर बनवली वीज –

भारतीय लष्करातील सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्या रामेहर यांनी कोंबडीच्या विष्ठेपासून वीजनिर्मिती करण्यासाठी त्यांच्या कोंबडी फार्ममध्ये एक प्लांट उभारला आहे. यापूर्वी त्यांनी दोन टाक्यांमध्ये गॅस तयार केला होता. त्यानंतर ५० टक्के गॅस आणि ५० टक्के डिझेलने जनरेटर चालवलं ज्यामुळे ३० किलोवॅट वीज निर्माण होऊ लागली. २०११ मध्ये, १६० घनमीटर डायजेस्टर टाकी बांधण्यात आली आणि त्यातून ५० किलोवॅट वीज निर्माण झाली. आता २४० घनमीटरची टाकी बनवण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांना कोठूनही वीज आणण्याची गरज भासत नाही.