Auto Rikshaw Message Photo Viral: सोशल मीडियावर दररोज लाखो फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही विषय मजेशीर; तर काही गंभीर असतात. सोशल मीडियावर रस्त्यावर लावलेल्या पाट्या, घर किंवा कार्यालयाबाहेर लावलेले सूचना फलक, वाहनांच्या मागे लिहिलेली घोषवाक्यं मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. काही पाट्या मजेशीर असतात; तर काही पाट्या थक्क करणाऱ्या असतात. सध्या अशीच एक पाटी समोर आली आहे. त्यावरील वाक्यं वाचून ती पाटी तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल हे नक्की. सध्या हा फोटो खूपच व्हायरल होत आहे.
रस्त्यावरून जाताना तुम्ही अनेकदा ट्रक, टॅक्सी वा रिक्षावर भन्नाट असं काहीतरी लिहिलेलं वाचलं असेलच. त्यातील काही कोट्स फार भावनिक अन् विचार करायला भाग पाडणारे असतात. त्यामुळे वाहनांवरील हे कोट्स अनेकदा लोकांचं लक्ष वेधून घेतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
रोजचं धावपळीनं भरलेलं आयुष्य, प्रत्येक क्षणी स्पर्धा आणि घड्याळाच्या काट्यांवर धावणारी माणसं. अशातच रस्त्यांवरून धावणाऱ्या एका साध्या रिक्षानं सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेतलं आहे. त्या रिक्षाच्या मागे लिहिलेल्या छोट्याशा ओळी; पण त्यातून प्रतीत होणारा वैचारिक प्रभाव जबरदस्त आहे. त्या ओळी पाहून अनेकांनी मोबाईल बाहेर काढून त्याचा फोटो घेतला असेल. त्यापैकी एक फोटो काही वेळातच सोशल मीडियावर पोस्ट झाला आणि पाहता पाहता तो व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आणि ‘यातलं शहाणपण आयुष्यात खरंच उपयोगी पडतं’, अशी भावना व्यक्त केली. असं काय लिहिलंयं रिक्षाचालकानं ते रिक्षाच्या मागे खाली दिलेल्या फोटोमध्ये पाहा जरा…
सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये रिक्षाचालकाच्या सीटच्या मागे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा संदेश लिहिल्याचे दिसत आहे. तिथे लिहिले आहे, “लवकर चल म्हणू नका. उशिरा तुम्ही आला आहात; मी नाही.” या ओळींद्वारे तो प्रवाशांना सांगू इच्छितो की, त्यांनी त्यांच्या चुकांसाठी इतरांवर दबाव टाकू नये आणि तो बरोबर आहे. वेगानं गाडी चालवताना किंवा लवकर पोहोचतानाही अपघात होऊ शकतो आणि कदाचित म्हणूनच त्यानं ‘ओव्हरटेक करणाऱ्यांच्या’ डोळ्यांत झोंबणारं अंजन घालण्यासाठी असं काहीतरी लिहिलं असेल. बरं, हा फोटो कधी आणि कोणत्या रिक्षाचा याची माहिती दिली गेलेली नाही; पण जर तो खरा असेल, असे गृहीत धरून व्हायरल केला जात आहे.
येथे पाहा फोटो
तुम्ही नुकताच पाहिलेला फोटो @Weird_Princy नावाच्या अकाउंटवरून X प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत ३६ हजारांहून अधिक लोकांनी तो फोटो पाहिला आहे. फोटो पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले, “तुम्ही खरे लिहिले आहे.” दुसऱ्या यूजरने लिहिले, “भाऊ, मला टोमणे मारल्यासारखे वाटते.” अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
खरं तर कधी कधी प्रेरणा मोठ्या पुस्तकांतूनच नव्हे, तर एखाद्या रिक्षाच्या मागे लिहिलेल्या मनाला भिडणाऱ्या एखाद्या ओळीतूनही मिळू शकते. आणि म्हणूनच पुढच्या वेळी रस्त्यावर असाल, घाईत असाल… तर डोळे उघडे ठेवा. कदाचित ‘तुमच्यासाठी’ एखादी ओळ वाट पाहत असेल!