अनेकदा आपण किराणा सामान असो किंवा खाद्यपदार्थ असो, विविध अॅपचा वापर करून मागवत असतो. त्यावरून सर्व सामान अगदी व्यवस्थित येत असले तरी, कधीकधी आपल्याला ऑनलाईन मागवलेल्या वस्तूंचा, पदार्थांचा अनुभव चांगला येत नाही. असेच काहीसे सध्या एका बंगळुरूमध्ये राहण्याऱ्या एका व्यक्ती सोबत घडले आहे. व्यक्तीने स्वीगीवरून चिकन शॉवर्मा मागवला होता. मात्र त्या पदार्थामध्ये चक्क लोखंडाचा एक लहान तुकडासुद्धा त्याला आढळला. याबद्दलची सर्व माहिती त्याने आपल्या रेड्डीट [Reddit] अकाउंटवर फोटो शेअर करत सांगितली आहे.
ऍब्सल्यूट शॉवर्मा या जागेवरून, त्या व्यक्तीने चिकन शॉवर्मा मागवला होता. यासाठी त्याने स्वीगी या फूड डिलिव्हरी अॅपच वापर केला होता. हा पदार्थ खात असताना त्या व्यक्तीला घास चावताना काहीतरी टणक पदार्थ जाणवला. त्याने तो टणक पदार्थ तोंडातून बाहेर काढल्यानंतर, तो चक्क एक लोखंडी तुकडा असल्याचे समजले. शॉवर्मासाठी चिकन भाजताना त्यासमोर जी लोखंडी जाळी लावलेली असते, त्याचा तो तुकडा असल्याचे व्यक्तीच्या लक्षात आले. याबद्दल त्याने अॅपवर तक्रार केली, मात्र स्वीगीचे सपोर्ट एजंट हा सर्व प्रकार अगदी हलक्यात घेत असल्याचे समजते. “या सर्व प्रकारात स्वीगीचे सपोर्ट एजंट अजिबात गांभीर्याने लक्ष घालत नाहीये. यावर काही कायदेशीर कारवाई करावी लागेल कि संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून ते स्वतः यामध्ये लक्ष घालतील?” अशा आशयाचे कॅप्शन फोटो शेअर करतांना लिहिल्याचे दिसते.
हेही वाचा : लहान मुलं रडत होती म्हणून कॅफे मालकाने कुटुंबीयांना दाखवला बाहेरचा रस्ता! नेमके प्रकरण काय आहे जाणून घ्या…
या रेड्डीटवरील फोटोमध्ये आपण अर्धवट खाल्लेला शॉवर्मा, तो लोखंडी तुकडा, एकूण झालेले बिल आणि स्वीगीच्या कस्टमर सपोर्टसोबतच्या चॅट्सचा स्क्रिनशॉट पाहू शकतो. ही पोस्ट ११ जानेवारी २०२४ रोजी शेअर केली असून, चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. या संपूर्ण प्रकारावर नेटकरी अतिशय संतापले आहेत. मात्र काहींनी या प्रकारामध्ये काय करायला हवे याचे सल्लेदेखील दिले आहेत. काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया पाहा.
“माझ्यासोबतदेखील असते झाले होते. मी स्वीगीवरून पिझ्झा मागवला होता आणि त्यामध्ये मला नख सापडले. यावर मी त्यांच्याकडून पूर्ण रिफंड घेतला. मला वाटते कि तुम्ही पुन्हा एकदा तक्रार करून पाहा. जमल्यास फोनवर बोलून बघा. चॅट्सपेक्षा त्याने अधिक फायदा होईल असे मला वाटते.” अशा पद्धतीची प्रतिक्रिया एकाने दिली आहे. “कोणताही पदार्थ ऑनलाईन मागवताना त्या जागेचे रिव्ह्यू गूगलवर तपासून पाहावे. मी कोणत्याही नवीन ठिकाणाहून अन्नपदार्थ मागवताना कायम असेच करतो.” असा दुसऱ्याने सल्ला दिला आहे. तिसऱ्याने, “झोमॅटोवर ती जागा असेल तर त्यावर हा रिव्ह्यू द्या आणि ट्विटरवर सर्व प्रकार शेअर करा.” असा अजून एक सल्ला दिलेला आहे. “कन्झ्युमर कोर्टात जाऊन त्यांच्याबद्दल तक्रार नोंदवा.” असे चौथा म्हणत आहे. तर शेवटी पाचव्याने,”खरंतर यात स्वीगीची नाही, तर त्या हॉटेलची चूक आहे.” असे लिहिले आहे.
@r/bangalore या अकाउंटने शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत ३.६K अपवोट मिळाले आहेत.