मांस हा अनेकांच्या आहारातील महत्त्वाचा भाग आहे. पण, यावर शाकाहारी समर्थक आणि प्राणी हक्क कार्यकर्त्यांचा तीव्र आक्षेप आहे. त्यामुळे ते वेळोवेळी लोकांना मांसाहार सोडण्याचे आवाहन करीत असतात. पण एका तरुणाने कुत्र्यांबाबत एक भलतीच मागणी केली आहे; जी वाचून लोक चांगलेच संतापले आहेत. या तरुणाने एका पोस्टरद्वारे कुत्र्याच्या मांसाची विक्री कायदेशीर करण्याची मागणी केली आहे. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोत एक तरुण हातात पोस्टर घेऊन उभा आहे. त्या पोस्टरवर कुत्र्याचे मांस कायदेशीर करा, माझ्या याचिकेवर सही करा, असे लिहिले आहे.
या फोटोने आता अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये भीती निर्माण झाली आहे. एक माणूस कुत्र्याचे मांस कायदेशीर करण्याची मागणी का करीत आहे, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. जगातील काही भागांमध्ये कुत्र्याचे मांस विकले जाते आणि खाल्लेही जाते. परंतु, भारतातील बहुतेकांना कुत्र्याचे मांस खाणे मान्य नाही. साहजिकच बहुतेक मांसाहारी लोकांनाही तरुणाची ही मागणी मान्य नाही.
अशी मागणी करणाऱ्या तरुणाचा फोटो @Bruisedwayneee या नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. फोटोत एक तरुण उभा आहे आणि त्याच्या हातात एक पोस्टर आहे; ज्यावर लिहिले आहे, “कुत्र्याचे मांस कायदेशीर करा. माझ्या याचिकेवर सही करा.”
या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. विशेषत: पाळीव प्राणीप्रेमी यावर भरभरून कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले की, मी त्याला काल चर्च स्ट्रीटवर पाहिले आणि मी त्याच्या तोंडावर ठोसा मारण्यासाठी त्याच्या अगदी जवळ गेलो होतो. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, सर्व प्राणी समान आहेत. परंतु काही प्राणी इतरांपेक्षा अधिक समान आहेत. त्यावर तिसऱ्या युजरने लिहिले की, आता हा एक मूर्ख विनोद असावा. कृपया मला सांगा की, यात काय विनोद आहे?
तरुणाने अशी जाहीरपणे मागणी का केली हे समजू शकलेले नाही. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, कमेंट करणाऱ्या एका व्यक्तीने दावा केला आहे की,तो या मुलाला ओळखतो. या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, या मुलाला व्हेगन फूडशी संबंधित ‘फॅक्ट’ सांगायचे होते. म्हणजे, कुत्र्यावर अत्याचार केल्यावर आपण चिडतो, पण शाकाहारी अन्न तयार करण्यासाठी शेतातील प्राण्यांची हत्या करायला आमची हरकत नाही.