महागड्या कारमधून प्रवास करण्याचे अनेकांचे स्वप्न असते, अशावेळी काही जण स्वत:ची कार खरेदी करून हे स्वप्न काही प्रमाणात का होईना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. पण, गरिबांना अनेकदा कितीही प्रयत्न करूनही कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. अशावेळी रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या अलिशान कार पाहूनच स्वप्नातील कार पाहिल्याचा आनंद व्यक्त करतात. अशावेळी अलिशान कार रस्त्यावर उभ्या असतील त त्यासोबत आवडीने फोटो काढतात. अशाच प्रकारे एका सर्वसामान्य घरातील काकांना रस्त्यावरील अलिशान कार पाहून फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. ज्यानंतर त्यांनी कारबरोबर एक सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. पण, हे सर्व त्या कारचा मालक पाहत होता. यानंतर त्याने पुढे येत असे काही केले, जे पाहून अनेक जण त्याच्या कृतीचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून अनेक जण माणूस पैशाने नाही तर अशाप्रकारे मनाने श्रीमंत असला पाहिजे, असे म्हणत आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला एक सुपर कार पार्क केलेली दिसतेय. यावेळी एक काका हातात बॅग घेऊन कारच्या बाजूने जात होते. ही सुपर कार पाहून त्यांनाही फोटो काढण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी पुढे जाऊन कारसोबत सेल्फी फोटो घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार मालकाने त्यांना फोटो घेताना पाहिले आणि कारमधून उतरून तो काकांजवळ पोहोचतो. यानंतर तो काकांना तुम्ही कारजवळ उभे रहा, मी तुमचा फोटो काढतो असे म्हणतो, जे ऐकून काकाही खूप खूश होतात. यानंतर कारचालक काकांचा एक सुंदर फोटो त्याच्या फोनमध्ये क्लिक करतो. यानंतर काका आपली बॅग घेऊन आनंदाने तिथून निघून जातात. हे दृश्य सोशल मीडियावर लोकांची मने जिंकत आहे.
पैशाने नाही, तर माणूस मनाने श्रीमंत असला पाहिजे
हा व्हिडीओ @aamirsharma नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे, जो आता अनेकांना खूप आवडला आहे. यामुळेच व्हिडीओला आतापर्यंत 35 लाख लाईक्स आणि 28.4 मिलियन (दोन कोटींहून अधिक) व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ३१ हजारांहून अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत. बहुतेक लोकांनी कार मालकाच्या कृतीचे कौतुक केले आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, काही सेकंदांसाठी असले तरी काही जण कॅमेऱ्यासमोर चांगले दिसण्याचे नाटक करतात! तर दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, माझे मन खूश झाले. तर तिसरा एक युजर म्हणाला की, भाऊ तू मनाने श्रीमंत आहेस.