प्रेम आंधळं असतात असं म्हणतात. प्रेमात पडलेली व्यक्ती कोणतीही गोष्ट करण्यासाठी तयार असते असं म्हटलं जातं. मात्र हे काहीही करण्याच्या नादात अनेकदा प्रेमवीर आपल्या कृतीचा इतरांना त्रास होईल हा विचार करत नाही. असाच काहीसा प्रकार बिहारमध्ये घडलाय. येथील एका प्रेमवीराने आपल्या प्रेमासाठी संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित केल्याचा प्रकार समोर आला आहे.

नक्की वाचा >> लग्न लागतानाच लाईट गेली अन् गोंधळ उडाला; अंधारात बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याशी केलं लग्न, घरी गेल्यावर सत्य समजलं अन्…

झालं असं की, पूर्व बिहारमधील पुर्निया जिल्ह्यातील गणेशपूर गावात गावकऱ्यांनी एका इलेक्ट्रीशियनला रंगेहाथ पकडलं आहे. हा इलेक्ट्रीशिएन गावातीलच त्याच्या प्रेयसीला अंधाराचा फायदा घेऊन लपून छपून भेटता यावं म्हणून संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित करायचा. बरं हे त्याने एकदाच केलंय असं नाही तर यापूर्वीही त्याने अनेकदा अशाप्रकारे वीजपुरवठा खंडित करुन आपल्या प्रेयसीची भेट गेतलीय.

गणेशपूर गावातील लोकांना आपल्या आजूबाजूच्या गावांमधील वीजपुरवठा सामान्यपणे खंडित होत नाही असं समजलं. यासंदर्भात त्यांनी चौकशी केली असता आपल्या गावातच वीज जाते असं त्यांच्या लक्षात आलं. मागील काही महिन्यांपासून सांयकाळच्या ठराविक कालावधीमध्ये गावामध्ये दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित व्हायचा. यामुळे गावकरी हैराण झाले होते.

इतर गावांमध्ये या वीजपुरवठा खंडित होण्यासंदर्भातील समस्येबद्दल चौकशी केली असता बाकी गावांमध्ये असं होत नसल्याचं गावकऱ्यांना समजलं. त्यानंतर त्यांनी हे नेमकं आपल्या गावाच्या बाबतीत का होतंय याचा छडा लावण्याचा निर्णय घेतल्याचं द ट्रीब्युनने दिलेल्या वृत्तात म्हटलंय. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर गावकऱ्यांना धक्काच बसला. गावातील इलेक्ट्रीशियन त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी स्वत: गावचा वीजपुरवठा खंडित करत असल्याचं गावकऱ्यांना समजलं.

गावकऱ्यांनी सापळा रचून या इलेक्ट्रीशियनला रंगेहाथ पकडलं आणि त्याची धुलाई केली. त्याचं मुंडन करुन त्याची गावातील रस्त्यांवरुन धींड काढली. त्याच्या प्रेमप्रकरणामुळे गावातील लोकांना मागील अनेक महिन्यांपासून कारण नसताना वीजेशिवाय अनेक तास रहावत लागत असल्याने गावकऱ्यांचा संताप अनावर झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेव्हा जेव्हा आपल्याला प्रेयसीला भेटण्याची इच्छा व्हायची तेव्हा आपण वीजपुरवठा खंडित करायचो अशी कबुली या इलेक्ट्रीशियनने दिली. मात्र आपला राग व्यक्त करुन झाल्यानंतर गावकऱ्यांनी या इलेक्ट्रीशियनचं लग्न सरपंच आणि गावातील पंचांच्या उपस्थितीत त्याच्या प्रेयसीसोबत लावून दिलं. स्थानिक पोलीस स्थानकातील प्रमुख विकास कुमार आझाद यांनी याप्रकरणामध्ये पोलिसांकडे कोणतीही तक्रार करण्यात आलेली नसल्याचं म्हटलंय.